Pune : भाजपच्यावतीने वारजे – माळवाडी परिसरातील परिचरिकांचा सन्मान

एमपीसी न्यूज – गेली अनेक वर्ष ‘सेवा परमो धर्म’, हे ब्रीदवाक्य घेऊन रुग्ण सेवा करणाऱ्या वारजे माळवाडी परिसरातील हाॅस्पीटल, क्लिनीकमधील सर्व परिचारिकांचा जागतिक परिचारिका दिनानिमित्त ट्राॅफी, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात या परिचारिकांनी तर रुग्ण सेवेचा कळस गाठला आहे. काही परिचारकांना तर आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही मृत्युशी दोन हात करीत आहेत. काही रोज मृत्युच्या दाढेत जाऊन काम करीत आहेत. पण, आपली सेवा त्यांनी कुठेही खंडीत होऊ दिली नाही.

त्यांच्या अतुलनीय सेवेचा सन्मान आता या काळात करणे शक्य नसल्याने आज सह्याद्री हाॅस्पीटलच्या परिचारिका शितल बल्लाडे आणि किलबिल क्लिनीकच्या सेविका गौरी आदमाने यांचा भारतीय जनता पार्टी वारजेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपत्र, फुलाचा गुच्छ, एक पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी रेश्मा दोशी, वर्षा पवार, रेणुका मोरे, अमजद अन्सारी आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. उर्वरित परिचारिकांचा सन्मान लाॅकडाऊन झाल्यानंतर करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक आणि स्वीकृत सभासद सचिन दांगट यांनी दिली.

दरवर्षी जागतिक परिचारिका दिनानिमित्त वारजे – माळवाडी परिसरातील परिचरिकांचा सन्मान करण्यात येतो. यंदा कोरोनाचे संकट भीषण असून परिचारिका जीव धोक्यात घालून काम करीत आहे. त्यांचा सर्वांनीच सन्मान करण्याची गरज असल्याचेही दांगट यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.