Pune : परवानगी न घेता फ्लेक्सवर नाव, फोटो छापू नये ; भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांना तंबी

एमपीसी न्यूज- अनधिकृत फ्लेक्सवर अनेकदा नेत्यांचे फोटो छापले जातात. त्यामुळे पक्षाची बदनामी असून नागरिकांमध्येही अशा फ्लेक्ससंबंधी तीव्र भावना असतात. त्यामुळे यापुढे कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा फोटो आणि नाव फ्लेक्सवर छापण्यापूर्वी संबंधितांची परवानगी घ्यावी. परवानगी न घेता नाव फोटो छापल्यास कारवाई करण्याचा इशारा महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिला आहे.

शहरात बेकायदा फ्लेक्सबाजी करण्यास उच्च न्यायालयानेही बंदी घातली आहे. तरीसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करून सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून बेकायदा फ्लेक्स उभारले जातात. अशाप्रकारे फ्लेक्स लावून चमकोगिरी करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अनेकदा तर ही फ्लेक्सबाजी नागरिकांना आणि वाहनचालकांनाही अडथळा ठरते. अशावेळी नागरिकांच्या भावना तीव्र असतात आणि नागरिक टीका करतात.

हा प्रकार आता अंगलट येत असल्याने अशाप्रकारे अनधिकृत फ्लेक्सबाजी व जाहिरातबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पुणे महापालिकेतील भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.