Pune : शहरात भाजपचे चार गट ; महापालिका पदाधिकारी बदलताना कोणाची भूमिका ठरणार महत्वपूर्ण ?

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आता भाजपचे चार गट निर्माण झाले आहेत. खासदार गिरीश बापट यांचा 1 गट, राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांचा दुसरा गट, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तिसरा गट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चौथा गट पुणे शहरात निर्माण झाला आहे.

पाटील यांचे नेतृत्व मानायला बापट गट तयार नाही. आम्हाला पुण्यातीलच ‘पाटील’की हवी, असे एका नगरसेवकाने सांगितले. तर, मागील अडीच वर्षातून काकडे गटाला महापालिकेत एकही मानाचे पद मिळाले नाही. त्यामुळे यावेळी हा गट सक्रिय झाला आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश दिलेले तब्बल 30 पेक्षा जास्त नगरसेवक भाजपमध्ये निवडून आले आहेत. यातील अनेक नगरसेवक अनुभवी आहेत. पुणे महापालिका पदाधिकारी बदलताना कोणता गट सरस ठरणार? याची उत्सुकता लागली आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघांत पराभवाला सामोरे जावे लागले. त्यावर एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे. आपणच पक्षाचे कसे प्रामाणिकपणे काम केले, हे सांगण्यासाठी भाजपचा प्रत्येक नगरसेवक आघाडीवर आहे. राज्य शासनाने पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिका महापौरपदाच्या आरक्षणाची 2001 पासूनची माहिती मागवून घेतली आहे. त्यामुळे आता कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याकडे लक्ष लागले आहे. महापौर मुक्ता टिळक यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. त्या आता कसबा मतदारसंघातून आमदार झाल्या आहेत. 2017 मध्ये भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते.

महापालिकेच्या 2012 – 2017 या टप्प्यात अडीच वर्षांत नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) गटातील महिलांसाठी महापौरपद राखीव होते. त्यानंत अडीच वर्षांत ते सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षित असल्याने आता ओबीसी पुरुष की अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गाचे आरक्षण पडणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like