Pune : महापालिकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गटाच्या चलतीची चर्चा!

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांना संधी देताच सभागृह नेतेपदी धिरज घाटे तर, स्थायी समिती अध्यक्षपदी हेमंत रासणे यांची निवड करण्यात आली आहे. या तिन्ही निवडी करण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा वाटा असल्याची चर्चा महापालिकेत आहे. हा एकप्रकारे खासदार गिरीश बापट आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांना धक्का मानला जात आहे.

पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर यांनी यासाठी जोरदार हालचाली केल्याची कुजबुज आहे. विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी आणि हडपसर मतदारसंघांतील पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच तातडीने या पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे घेण्यात आले.

धरणांत 100 टक्के पाणीसाठा असतानाही पुणेकरांना दोन वेळ शुद्ध पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचे तक्रारी करण्यात येत होत्या. पाणी नाही तर मत नाही, अशी भूमिका हडपसर, वडगावशेरी, शिवाजीनगर मतदारसंघांतील नागरिकांनी घेतली होती. महापालिका पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर आमदारही नाराज असल्याची चर्चा होती.

आगामी महापालिकेच्या कामकाजावर चंद्रकांत पाटील यांचीच चलती राहणार आहे. बापट हे सभागृह नेतेपदासाठी नगरसेवक महेश लडकत यांच्यासाठी आग्रही होते. तर, काकडे गटाला सभागृह नेते पद नाही तर, स्थायी समिती अध्यक्ष पद तरी मिळणार, असे बोलले जात होते. पण, या गटाचीही आशा फोल ठरली. भाजपमध्ये प्रवेश करून नगरसेवक झालेल्या नगरसेवकांची संख्या 30 च्या आसपास आहे. त्यांना कोणतेही मनाचे पद मिळाले नाही. त्यामुळे हे नगरसेवक नाराज आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.