Shivajinagar: राज्य सरकार विरोधात चीड आणि रोषाची भावना : जगदीश मुळीक

एमपीसी न्यूज – गेल्या तीन महिन्यांत राज्यातील महाविकास आघाडी सरकार निष्क्रीय आणि अपयशी ठरल्याने जनतेमध्ये या सरकारबद्दल चीड आणि रोषाची भावना असल्याचे मत शहर भाजप अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केले.

शहर भाजपच्या वतीने निष्क्रीय आणि अपयशी राज्य सरकारच्या विरोधात मंगळवारी सकाळी बालगंधर्व रंगमंदिर चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता धीरज घाटे, माजी आमदार दिलीप कांबळे, योगेश टिळेकर, मेधा कुलकर्णी, प्रदेश संपर्क प्रमुख गणेश बिडकर, शहर सरचिटणीस राजेश पांडे, दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष, युवा मोर्चा अध्यक्ष दीपक पोटे, महिला आघाडी अध्यक्षा शशिकला मेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आंदोलनात पाच हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

जगदीश मुळीक म्हणाले, ‘राज्य सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. महिलांवरील अत्याचारात गेल्या काही दिवसांत वाढ झालेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. भाजप सरकारने सुरू केलेल्या विकास योजना स्थगित करण्याचा एक कलमी  कार्यक्रम राबवत आहे. त्यामुळे जनतेमध्ये सरकारविरोधात असंतोषाची भावना आहे.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘सरकारने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना सुरू केली. या योजनेत कोणत्याही अटी टाकल्या जाणार नाहीत असे आश्‍वासन दिले होते. प्रत्यक्षात अनेक अटी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे.

धीरज घाटे म्हणाले, ‘या राज्यातील महिलांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे. पोलीसांचा वचक राहिलेला नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे.

पांडे म्हणाले, ‘हे सरकार स्थगिती सरकार आहे. भाजप सरकारने घेतलेले लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती दिली जात आहे. गेल्या काही दिवसांत महाआघाडी सरकारच्या मंत्र्यांची वक्तव्ये वाचली तर पुणे शहरातील महत्त्वाचा मेट्रो, एचसीएमटीआर आणि हायपरलूप प्रकल्पांना धोका निर्माण झाला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.