Pune : भाजपने दाखवला शिवसेना आरपीआयला ठेंगा

एमपीसी न्यूज – 2014 मध्ये पुणे शहरातील आठही मतदारसंघात भाजपने कमळ फुलवले होते. त्यामुळे 2019 च्या निवडणुकीत देखील भाजपने आठही मतदारसंघात उमेदवार जाहीर करून शिवसेना – आरपीआय (आठवले गट) ला ठेंगा दाखवला आहे.

कोणत्याही परिस्थितीत या आठ मतदारसंघांपैकी एकही मतदारसंघ मित्र पक्षाला सोडण्यात येणार नसल्याचे भाजपचे पुणे प्रभारी आशिष शेलार, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ यांनी ठणकावून सांगितले होते. तरीही शिवसेना दोन तर, आरपीआय एक जागा मिळणार, असा आशावाद व्यक्त करीत होता. मात्र, भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत आठही मतदारसंघावर आपले उमेदवार घोषित केले आहेत.

कसबा मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना ही हडपसर, शिवाजीनगर किंवा कोथरूडसाठी आग्रही होती. तर, आरपीआय ला पुणे कॅन्टोन्मेंट किंवा वडगावशेरी मतदारसंघ मिळण्याची अपेक्षा होती. या दोन्ही पक्षाची अपेक्षा फेल ठरली. शिवाजीनगर मतदारसंघात माजी खासदार पुत्र सिद्धार्थ शिरोळे यांच्या उमेदवारीला काही भाजप कार्यकर्त्यांचा विरोध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.