Pune : पीएमपीएल तिकीट दरवाढीला भाजपचा विरोध

एमपीसी न्यूज- इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएलच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यास पीएमपीएल प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रशासनाच्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी सांगितले.

इंधन दरवाढीचा कोणताही बोजा प्रवाशांवर टाकणार नाही. त्यामुळे पीएमपीएल प्रवासाच्या भाडेवाढीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे भारतीय जनता पक्षाने स्पष्ट केले आहे. तसेच, प्रशासनाच्या दरवाढीच्या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचेही पक्षाने स्पष्ट केले आहे. पीएमपीएल प्रशासनाकडून पहिले दोन टप्पे वगळता उर्वरित टप्प्यांसाठी दरवाढ लागू होईल, असे नुकतेच सांगण्यात आले आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करू, असे त्यांनी म्हटले आहे.

मात्र, पीएमपीएलच्या प्रवासी भाडेवाढीला भाजपचा विरोध असेल, असे गोगावले यांनी म्हटले आहे, तर संचालक मंडळाच्या बैठकीत प्रशासनाच्या प्रस्तावाला विरोध केला जाईल, असे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हटले आहे. उत्पन्नाचे पर्यायी स्रोत निर्माण करून पीएमपीएलवर वाढलेला बोजा कमी करू, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.