एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे शासन आणि प्रशासन आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा  आरोप करत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी काळ्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार उद्या (शुक्रवारी) सकाळी 11 वाजता नागरिकांनी काळी वस्त्रे परिधान करून किंवा काळ्या फिती लावून आपापल्या घराच्या गच्चीतून, व्हरांड्यातून किंवा अंगणातून निषेध करण्याचे आवाहन केले आहे.

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी यासंदर्भात संघर्षाची वेळ असल्याबाबत कार्यकर्त्यांना केलेल्या सूचनांचा संदर्भ देखील भेगडे यांनी यावेळी दिला. याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, COVID-19 लॉकडाऊनचे चौथे चरण सुरू झाले. आपण सर्वजण जवळपास मागील पावणेदोन महिने विविध सेवा कार्यात येनकेन प्रकारे व्यस्त आहोत. आपल्या परिसरातील नागरिकांचे जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जे आपले एक राजकीय नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून कर्तव्य पण आहेच.

या काळात आपण रचनात्मक कामावरच अधिक भर दिला पण महाराष्ट्रातील जनतेच्या दुर्दैवाने म्हणा कोरोनाचा धोका अधिकाधिक व्याप्ती वाढवत तीव्र होत आहे. अजूनही शासन प्रशासनाला आणीबाणीची ही परिस्थिती नीट हाताळता येत नाही असे दिसत आहे. मुंबई, पुणे, ठाणे, मालेगाव, संभाजीनगर येथे तर सबकुछ रामभरोसे असेच चालले आहे, असा शेरा भेगडे यांनी मारला.

केंद्र शासनाने खूप कठोर उपाययोजना करत एक अभूतपूर्व असे जम्बो पॅकेज घोषित केले. प्रत्येक राज्याला त्याच्या वाट्याची आर्थिक मदत व अन्य मदती केंद्र शासन करत आहेच. अनेक राज्यांनी केंद्राच्या घोषणेच्या आधी किंवा नंतर स्वतःच्या राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी विविध पॅकेजेस घोषित केली आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मात्र अजूनही हातात कटोरा घेऊन उभा आहे अद्यापपावेतो केंद्राकडे बोट दाखवण्याशिवाय कुठलीही पॅकेज घोषित केले नाही, की कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत, असा आरोप भेगडे यांनी केला.

राज्यावर मोठे संकट ओढवलेले असताना आपल्यासारख्या संघर्षशील कार्यकर्त्याला गप्प बसून चालणार नाही, विरोधी पक्षाची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. सर्वसामान्यांचा आवाज, त्यांच्या भावना याला योग्य तो प्रतिसाद देण्याची हीच नेमकी वेळ आहे आणि म्हणून गेली दोन महिने आपण सरकारच्या मागे या भयंकर स्थितीत उभे राहण्याचा निर्णय घेऊन कुठलाही संघर्ष टाळला पण आता ते शक्य नाही, अशी आंदोलनामागील भूमिका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

बूथस्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या सरकारचा निषेध करून त्याला जाब विचारण्यासाठी, लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळूनच हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असे भेगडे यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत सर्वांनी मोठ्या संख्येने असाल त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भेगडे यांनी केले आहे.

प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःच्या घरीच गॅलरीत व्हरांड्यात किंवा अंगणात दो गज कि दूरी चे पालन करून घरातील सदस्यांसह एकत्र यावे. तोंडाला फेस कवर (मास्क) असणे अनिवार्य. डोक्यावर काळी रिबीन, काळा रुमाल, काळी ओढणी बांधावी किंवा काळ्या फिती लावाव्यात, काळे कपडे असतील तर ते परिधान करावेत.  निषेधाच्या घोषणांचे काळ्या शाईने लिहिलेले किंवा काळ्या पार्श्वभागावर पांढऱ्या अक्षराने लिहिलेले फलक हातात धरावेत. सकाळी 11ते 11.30 असे 30 मिनिटांचे आंदोलन असावे, या वेळेतच ते करावे अधिक वेळ करू नये, आदी सूचना पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.