Pune : आगामी निवडणुकीतील विजयाकरीता भाजपचे ‘दगडूशेठ’ गणपतीला साकडे!

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी घातला गणपतीला अभिषेक

एमपीसी न्यूज – भारतामध्ये सर्वत्र सत्ता मिळो…आगामी निवडणुकीत यश व विजय मिळो… संपूर्ण देशामध्ये सुख-समृद्धी नांदो… अशी प्रार्थना भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दगडूशेठ गणपती चरणी अभिषेकातून केली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा गणेशनामाच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोषाने दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर दुमदुमून गेला.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने जे.पी.नड्डा यांचे यशोचित स्वागत व सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा चे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री व्ही.सतिश, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उत्सवप्रमुख व नगरसेवक हेमंत रासने, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार गिरीष बापट, आमदार माधुरी मिसाळ, जगदीश मुळीक यांसह स्थानिक नगरसेवक व भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.

लोहगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर जे.पी.नड्डा यांनी प्रथम दगडूशेठ गणपती मंदिरात येऊन गणरायाचे दर्शन घेतले. यानंतर गणरायाची आरती देखील केली. ट्रस्टतर्फे महावस्त्र, सन्मानचिन्ह देऊन अशोक गोडसे व हेमंत रासने यांनी नड्डा यांचा सन्मान केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.