Pune : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अधिक संशोधन होण्याची गरज – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

एमपीसी न्यूज- भारताच्या, महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे संशोधन व अभ्यास आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग आपण म्हणावा तसा करुन घेतला नसल्याची खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली. भांडारकर संस्था आणि स्नेहल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित झालेल्या शिवराज भूषण ग्रंथाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे नियामक परिषदेचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, ग्रंथाचे लेखक डॉ. केदार फाळके, माजी खासदार प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंग बलकवडे, डॉ. गो. बं. देगलूरकर, अॅड. सदानंद फडके व स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा भांडारकर संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे शौर्याबरोबरच विलक्षण प्रतिभा आणि बुध्दीमत्ता देखील होती आणि त्याच जोरावर त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. पराक्रमी हिंदू राजा म्हणून ओळख असली तरी त्यांनी कधीही कोणत्याही धर्म, जात, संप्रदायाचा द्वेष केला नाही. शिवरायांच्या पराक्रमाची, त्यांच्या कार्याची माहिती करुन घेण्यासाठी, संशोधन करण्यासाठी जगभरातून संशोधक येत आहेत, आपण मात्र तितकासा अभ्यास केलेला नाही. आपला सुप्त समाज दिवसेंदिवस सुन्न होत चालला आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. केवळ उपचार म्हणून शिवजयंती साजरी न करता महाराजांना समजून घेवून त्यांच्या जीवनातील छोट्या-मोठ्या प्रसंगांचा अंगिकार करण्याची नितांत आवश्यकता आहे”

ग्रंथाचे लेखक व संशोधक डॉ. केदार फाळके म्हणाले, “कवी भूषण यांनी इसवीसन 1673 मध्ये शिवभूषण रचले. विविध नऊ भाषांचा, विविध छंदांचा त्यांनी उपयोग केला. या ग्रंथाच्या 14 हस्तलिखीतांची नोंद झालेली आहे. या सगळ्याचे पुरेसा अभ्यास करुन हा ग्रंथ साकार केला आहे, तो सर्वतोपरी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. कवी भूषणाचे छंद हे राष्ट्रीय प्रतीक आहे, त्यामुळे ती अभ्यासक्रमात आली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, त्यांचे शौर्य, पराक्रम, बुध्दीमत्ता या सर्वाचे अत्यंत स्पष्टपणे कवी भूषणाने एका अर्थाने चित्रण केले आहे. शिवराय समजून घेण्यासाठी कवी भूषणाचे काव्य खूप काही सांगून जातात”

माजी खासदार रावत म्हणाले, “महाराष्ट्र दिनाच्या दिवशी छत्रपती शिवरायांवर पुस्तक प्रकाशित होत आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आज संपूर्ण भारतात शालेय शिक्षणात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत म्हणावी तेवढी माहिती दिली जात नाही. ते वाढवण्याची गरज आहे. चांगले संशोधक आणि वस्तुनिष्ठ खऱ्या इतिहासकारांची कमतरता जाणवते आहे. आज काही भ्रष्ट इतिहासकारानी धंदा सुरु केला असून शिवरायांचे हिंदूत्व काढून औरंगजेबाला दयाळू, समाजसेवक दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्यामुळे असहिष्णूता वाढीस लागत आहे. मूळात शिवरायांचा संघर्ष हा असहिष्णूतेशी होता”

यावेळी अभय फिरोदिया म्हणाले की, भांडारकर संस्थेत दुर्मिळ हस्तलिखिते व ग्रंथसंपदा आहे. याचा सर्वांनी मोठ्या प्रमाणावर उपयोग करुन घ्यावा. दुर्मिळ साहित्य जपण्याची गरज असून त्यासाठी येथे भव्य संग्रहालय उभे केले जाणार असल्यास भरघोस निधी देण्याची तयारी देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन शेट्ये यांनी केले तर दीपा भंडारे यांच्या शिववंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.