Pune : पुस्तकेसुध्दा आपले गुरू असतात – जोत्सना शिंदे

चिंचवडमधील खिंवसरा पाटील विद्या मंदिरमध्ये गुरुपोर्णिमा उत्साहात

एमपीसी न्यूज – पुस्तकेसुद्धा आपले गुरू असतात. अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचत जावा. आठवड्यातून दोनदा ‘पुस्तक डे’ साजरा करा. मोठी स्वप्ने पहा व ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शिक्षकांचे सहकार्य घ्या आणि प्रयत्न करा. संत कबीरांचे दोहे सांगून गुरूंचे महत्त्व विशद केले, असे प्रतिपादन प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवडगाव संचलित खिंवसरा पाटील विद्यामंदिरमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला.

यावेळी प्रमुख म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, उपसभापती शर्मिला बाबर, पर्यवेक्षक रविंद्र शिंदे व क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, सदस्य गतीराम भोईर, नीता मोहिते, आसाराम कसबे, शाळेतील सेवानिवृत्त सेविका रतन सुरवसे व त्यांचे पती भारत सुरवसे, त्यांच्या सुना साधना सुरवसे व छाया सुरवसे, शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप, लोकमान्य टिळक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर, बालवाडी विभाग प्रमुख आशा हुले, सर्व शिक्षक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

  • आरती खटाणे या विद्यार्थिनीने गुरु-शिष्यांची गोष्ट सांगून गुरूंची महती व्यक्त केली. आशा हुले या शिक्षिकेने “सद्गुरु वाचुनी सापडेना सोय” हे भजन सुरेल आवाजात गायले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे पर्यवेक्षक रविंद्र शिंदे म्हणाले की, संस्कारांची जडण-घडण करणारी ही शाळा आहे. विद्यार्थ्यांकडून सुद्धा शिक्षक काही ना काही शिकत असतात म्हणून विद्यार्थीसुद्धा शिक्षकांचे गुरू असतात. जिवनात अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी, दृश्य-अदृश्य गोष्टींकडून आपण शिकत असतो . हे सर्व आपले गुरू आहेत, असं सांगून गुरूंची महती व्यक्त केली. शाळेतील उपक्रमांचे, शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले.

  • उपसभापती शर्मिला बाबर यांनी विद्यार्थ्यांना मोठे झालात तरी आई-वडील आणि गुरु यांना कधीही विसरू नका असा मोलाचा सल्ला दिला. साधना सुरवसे यांनी “गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे गीत सुरेल आवाजात गायले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील सेवानिवृत्त सेविका रतन सुरवसे यांचा पोशाख व शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्याध्यापक नटराज जगताप यांनी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कार्य व खिंवसरा पाटील विद्यामंदिर या शाळेने आजपर्यंत केलेल्या प्रगतीविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा आखाडे व प्रास्ताविक सुधाकर हांडे यांनी केले. आभार पुष्पा जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.