Pune : बोपोडीतील रुग्णालयातही नागरिकांची होणार तपासणी; डॉ. नायडू रुग्णालयावरील ताण कमी होणार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या शाळा व रात्रनिवारा येथील नागरिकांची बोपोडी येथील रुग्णालयात तपासणी केली जाणार आहे. वेळीच तपासण्या व जलद निर्णयामुळे डॉ. नायडू रुग्णालयावरील पर्यायी व्यवस्थेमुळे ताण कमी होण्यास मदत होणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

वृद्धाश्रमातील नागरिक, वृद्धांच्या सोसायटी व वृद्ध निवाऱ्यातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीच्या अनुषंगाने व जलदगतीने तपासणी व औषध उपचार मिळावेत, या दृष्टीने मनपाने अलीकडेच १५ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत १५ वैद्यकीय पथके नियुक्ती केलेली आहेत.

डॉ. नायडू रुग्णालयावर अधिक ताण येऊ नये, त्यादृष्टीने बोपोडी येथील कै. मुरलीधर खेडेकर रुग्णालयात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी ताप, थंडी, खोखला,कफ, सर्दी यानुसार करण्यात येईल. यावेळी लक्षणे आढळल्यास संबंधित व्यक्तीचा थुंकीचा नमुना ( स्वाब ) घेण्यात येईल. राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नमुना पॉझिटिव्ह निघाल्यास डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात त्या व्यक्तीस उपचारार्थ दाखल करण्यात येईल.
नमुना अहवाल निगेटिव्ह निघाल्यास बोपोडी येथील कै. मुरलीधर खेडेकर रुग्णालयात तपासणीनुसार औषध उपचार करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.