Pune : कोरोनाच्या दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर; ‘त्या’ रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी पाच पथके

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

एमपीसी न्यूज – पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. या रुग्णांना पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. एका रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तर दुसऱ्या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाही. या दोन्ही रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी महसूल, आरोग्य, पोलीस, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांची पाठ पथके तयार करण्यात आली आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

दोन्ही रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या-ज्या ठिकाणी प्रवास केला आहे, त्या ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही व्यक्ती फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दुबई येथे ४० जणांच्या ग्रुप सोबत फिरायला गेले होते. ते एक मार्च रोजी भारतामध्ये परत आले आहेत. या दोन व्यक्ती पैकी एका व्यक्तीला त्रास झाल्यामुळे त्यांनी 8 मार्च रोजी डॉक्टरांकडून आपली तपासणी केली असता त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे निदर्शनास आले आहे.

दुबई हे ठिकाण केंद्र शासनाने जाहीर केलेल्या बाधित ठिकाणांच्या यादीमध्ये नाही. त्यामुळे संशयित रुग्ण एक मार्च रोजी भारतात परत आल्यानंतर त्यांचे विलगीकरण करण्यात आले नाही. दोन्ही व्यक्तीच्या भारतात परत आल्यानंतर संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि ठिकाणांची माहिती घेण्यात आली आहे. या दोन्ही रूग्णांचे कुटुंबीय, मित्र परिवार तसेच त्यांचे कार्यालयीन ठिकाणी असलेले अधिकारी-कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. आतापर्यत रूग्णांच्या कुंटुंबातील तीन व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

रुग्णालयात दाखल केलेल्या दोन्ही व्यक्तींसोबत दुबई येथे गेलेल्या एकूण 40 व्यक्तींची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे विविध जिल्ह्यातील नागरिक आहेत. संबंधित जिल्हा प्रशासन त्यांना संपर्क करून त्यांची तपासणी करण्याबाबत आवश्यक ती कारवाई करत आहे. वरील दोन्ही व्यक्तीं ज्या व्यक्तीच्या ओला टॅक्सीने मुंबई वरून पुण्याला आले त्या टॅक्सी ड्रायवरची माहिती घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना देखील सोमवारी (दि. 9) रात्री रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.

वरील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार आहे. शहरातील दोन्ही महापालिकांच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 21 ठिकाणी 207 बेड, अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसेच विलगीकरण कक्षासहित तयार करण्यात आलेले आहे. इंडियन मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातून जिल्हयातील सर्व डॉक्टरांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांचेकडे आलेल्या रूग्णांची तपासणी करत असतांना परदेशातून भारतात आलेल्या रूग्णांची माहिती वेगळयाने ठेवावी, असेही म्हैसेकर म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.