Pune : वृक्ष संवर्धनासाठी स्वस्थळी व स्थलबाह्य संवर्धन या दोन्ही पद्धती महत्त्वाच्या – माधव गाडगीळ

एमपीसी न्यूज – सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील (Pune) दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षवल्लींचे संवर्धन करताना ‘इन सीटू’ अर्थात स्वस्थळी आणि ‘एक्स सिटू’ अर्थात स्थलबाह्य अशा दोन्ही पद्धतीने संवर्धन करायला हवे, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

पश्चिम घाटातील दुर्मिळ होण्याच्या मार्गावर असलेल्या वृक्षांच्या संवर्धनासाठी ‘एक्स सिटू’ पद्धतीने पौड जवळील, नांदगाव येथील आर्क वेलनेस रिट्रीट येथे यशस्वीरित्या साकारलेल्या सह्याद्री वन उद्यानाचे उद्घाटन गाडगीळ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फुलांच्या संशोधनासाठी गेली अनेक वर्षे काम करणारे श्रीकांत इंगळहळीकर, आर्क वेलनेस रिट्रीटचे संस्थापक डॉ. लक्ष्मण कुलकर्णी, हॉटेल व्यवसायातील आघाडीचे उद्योजक विठ्ठल कामत, सह्याद्री अकादमी ऑफ इकॉलॉजिकल सायन्स चे संस्थापक के. सी. मल्होत्रा, नांदगावचे सरपंच चेतन फाले, पौड – मुळशीचे वन अधिकारी संतोष चव्हाण, वनरक्षक संतोष मुंढे आदी यावेळी उपस्थित होते.

पुण्यातील श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या या वन उद्यानात निसर्गप्रेमींना पश्चिम घाटातील तब्बल 300 दुर्मिळ वृक्ष पहायला मिळणार आहेत. यासोबतच त्याचे शास्त्रीय नाव व इतर माहिती देखील येथे उपलब्ध असेल.

या वेळी बोलताना गाडगीळ म्हणाले, “एक्स सिटू पद्धतीने केलेल्या संवर्धनाप्रमाणेच इन सीटू पद्धतीने केलेले वृक्षारोपण देखील 80 टक्क्यापर्यंत यशस्वी ठरू शकते, हे मी प्रसिध्द पर्यावरणवादी चंडी प्रसाद भट्ट यांच्या उत्तराखंड मधील लोकसहभागातून केलेल्या वृक्ष संवर्धनाच्या उपक्रमात अनुभवले आहे.”

वटपौर्णिमेचा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो म्हणजेच अंदाजे 1 हजार 500 वर्षापूर्वीच्या कालखंडात. परंतु त्याआधी अस्तित्वात असलेल्या मोहंजदारोच्या संस्कृती मध्ये पिंपळाच्या पानाच्या (Pune) आकाराचा शिक्का मिळाल्याने त्या संस्कृतीमध्ये या प्रजातीतील वृक्षांना महत्व दिल्या गेले असल्याची ही बाब अधोरेखित होते, असेही गाडगीळ म्हणाले.

MPC News Special : कुंडमळ्यातील बंधारा अपघातांचा ‘ब्लॅक स्पॉट’

रहाटया / देवराई सारख्या संकल्पना देशातील कर्नाटक, गोवा, केरळ यासारख्या इतर राज्यांमध्ये देखील आहेत आणि त्या फक्त धार्मिक श्रद्धेतून जपल्या किंवा राखल्या गेल्या आहेत, या मान्यतेला तडा देणारे काही अनुभव मला आले. यामध्ये धार्मिक भावनेशिवाय अशा प्रकारच्या वनराजींचे होत असलेले इतर फायदे महत्वाचे होते, अशी जाणीव मला झाली.

ज्यामध्ये औषधी वनस्पती, प्राण्यासाठी तयार होणारी इकोसिस्टम आदी बाबींचा समावेश आहे. गोवा राज्यात ‘गावकरी’ व्यवस्थेमुळे तर गडचिरोली जिल्ह्यात ‘सामुहिक वनाधिकार’ मिळाल्याने मोठमोठ्या जागा स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने देवाचं जंगल म्हणून राखून ठेवल्या आहेत. याचाच अर्थ असा की विविध पद्धतीने आणि विविध माध्यमातून वनराजींचे संरक्षण व संवर्धन करण्यात येत आहे. या सर्व बाबींविषयी साधक बाधक चर्चा होऊन याविषयीची पुढील वाटचाल ठरवायला हवी, असे मत देखील यावेळी गाडगीळ यांनी व्यक्त केले. यामध्ये समाज व्यवस्था व शासन व्यवस्था याच्या देखील विचार व्हायला हवा, असे गाडगीळ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.