Pune : रस्त्याच्या कामाचे बिल मंजुर करण्यासाठी अडीच लाखांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

Branch engineer 'ACB' caught accepting bribe of Rs 2.5 lakh for approving road works bill

एमपीसीन्यूज : रस्त्याच्या कामाचे 50 लाखाचे बिल मंजुरीकरीता पाठवण्यासाठी शाखा अभियंता म्हणून सही करण्यासाठी 3 लाखांची लाच मागून तडजोडीअंती अडीच लाखांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. आज, गुरुवारी ही कारवाई करण्यात आली.

विलास गोपाळराव तांबाळे ( वय -57) असे या शाखा अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी 53  वर्षीय ठेकेदाराने तक्रार दिली होती. संबंधित ठेकेदाराला सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पुणे जिल्ह्यातील रस्त्याचे काम करण्याचे कंत्राट मिळाले होते.

हे काम तक्रारदार ठेकेदार यांनी पूर्ण केले. तसेच या कामाचे एकूण 50 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी ते सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक चारचे शाखा अभियंता तांबाळे यांच्याकडे गेले. त्यावेळेस तांबाळे यांनी बिल मंजुरीसाठी पाठविण्यासाठी सही करण्याकरीता तक्रारदाराकडे तीन लाखांची लाच मागितली. शेवटी या रकमेत तडजोड होऊन अडीच लाख रुपये देण्याचे ठरले.

हि अडीच लाखाची रक्कम बंडगार्डन येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता कार्यालयात देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज, गुरुवारी सापळा रचून तांबाळे यांना तक्रारदारकडून अडीच लाखाची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक सीमा मेहेंदळे, श्रीहरी पाटील, पोलीस निरीक्षक गिरीश सोनावणे, पोलीस नाईक नवनाथ माळी, वैभव गोसावी, अविनाश इंगुळकर, पोलीस शिपाई पांडुरंग माळी यांच्या पथकाने कारवाईत सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.