गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023

Pune Breaking News : दौंड हत्याकांडाचे गुढ उलगडले; संशय अन बदल्याच्या भावनेतून सात जणांचा खून

एमपीसी न्यूज – दौंड तालुक्यातील पारगाव (Pune Breaking News) येथे भीमा नदीकाठी सापडलेल्या सात मृतदेहांचे रहस्य अखेर उघडकीस आले आहे. नातेवाइकांनीच नातेवाईकांचा घात केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. ही आत्महत्या नसून संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

संशय अन बदल्याच्या भावनेतून भावाचे संपूर्ण कुटुंब संपवल्याचे धक्कादायक सत्य पोलीस तपासात समोर आले आहे. यवत पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या हत्याकाडांत अगदी पाच व तीन वर्षाच्या मुलांचा देखील समावेश आहे.

अशोक कल्याण पवार (वय 39), शाम कल्याण पवार (वय 35), शंकर कल्याण पवार (वय 37) प्रकाश कल्याण पवार (वय 24) आणि एक महिला असे सर्व राहणार निघोज ता. पारनेर, अहमदनगर अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

तर मोहन उत्तम पवार (वय 45), संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय 40), राणी शाम फलवरे (वय 24), रितेश उर्फ भैय्या शाम फलवरे (वय 7) छोटू शाम फलवरे (वय 5) कृष्णा शाम फलवरे (वय 3) अशी मयत इसमांची नाव एसून मोहन व त्यांचा जावई हे सारे हे मागील एक वर्षापासून निघोज येथे मजूरी काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना 18 ते 22 जानेवारी या चार दिवसात सात मृतदेह पारगावच्या हद्दीत वाहून आलेले आढळले. पोलिसांचाही गुंता दिवसेंदिवस वाढत होता. सुरुवातीला आत्महत्या वाटणाऱ्या घटनेने मात्र पुढे वेगळेच वळण घेतले. मयत महिलेजवळ पोलिसांना एक मोबाईल सापडला. त्यात पोलिसांनी नातेवाईकांचे नंबर शोधून काढले, निघोज येथे जाऊन तपास केला असता धक्कादायक सत्य समोर आले.

आरोपी अशोक कल्याण पवार याचा मुलगा धनंजय याचा काही महिन्यापुर्वी अपघाती मृत्यू झाला होता. यावेळी मयत मोहन यांचा मुलगा अनील मोहन पवार हाच जबाबदार आहे असा आरोपींना संशय होता. त्याचा राग मनात धरून आरोपींनी संपूर्ण कुटुंबाचा गळा दाबून खून केला व मृतदेह नदीमध्ये फेकून दिले.

मात्र पोलिसांनी या प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती असून यात आणखी सत्य समोर येण्याची शक्यता आहे.याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहूल धस करत आहेत.

 

Latest news
Related news