Pune : कोरोनाला आटोक्यात आणा, निधी कमी पडणार नाही : अजित पवार

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट अंतर्गत कार्यान्वित केलेल्या वॉर रूम प्रणालीची कार्यपद्धती उपमुख्यमंत्री  पवार यांनी शुक्रवारी समजून घेतली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त, शांतनु गोयल, आरोग्य विभाग प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेने ही प्रणाली विकसित केली आहे. याठिकाणी अत्याधुनिक संगणकीय प्रणाली आहे. बाधित रुग्ण, शहरातील बाधित क्षेत्र, वाढत असलेला परिसर याची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे उपाययोजना करणे सोपे झाले आहे, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले. बेडची उपलब्धता, भविष्यात लागणारे बेडस्, डॉक्टरांची संख्या या डॅश बोर्डवर नमूद आहे, असे रुबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

कोरोना बाधित रुग्णाचा फोन आला तर तातडीने रुग्णवाहिका पोहोचली पाहिजे.  भविष्याच्या दृष्टिकोनातून बालेवाडीप्रमाणे इतर ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित करा, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या. पुण्यातील कोरोनाचे संकट तातडीने आटोक्यात अण्णा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आवश्यकता असेल तर निधीची मागणी करा, असेही   पवार म्हणाले.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी खासदार गिरीश बापट यांनी अजित पवार यांनी लोकप्रतिनिधीची बैठक घेतली नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शुक्रवारी बैठक झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात कोरोना वाढत असल्याने भाजप महाविकास आघाडी विरोधात आक्रमक झाला आहे. शहरातील नेत्यांनीही एकमेकांविरोधात जोरदार आरोप प्रत्यारोप केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.