Pune : पावसाळी कामांऐवजी सुशोभीकरणाचे टेंडर आणणे गंभीर बाब : दीपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक असलेली पावसाळी कामे मार्गी न लावता सुशोभीकारणाचे टेंडर आणणे गंभीर बाब असल्याचे विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी म्हटले आहे.

सद्यस्थितीत कोरोनाचे पुणेकरांवर भयानक संकट आहे. त्यामध्ये जर दुसरी आपत्ती आल्यास आपल्याला फार मोठे नुकसान सोसावे लागणार आहे, अशी भीतीही आयुक्तांना दिलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेचे नवीन आर्थिक बजेट हे मार्च महिन्यापासून सुरू झाले आहे. आता पावसाळाही तोंडावर आहे. मात्र, अद्यापही पावसाळी कामांना सुरुवात झालेली नाही. ड्रेनेज लाईनची कामे, गटारी साफ करण्याची कामे, ओढ्या- नाल्या लगत सीमाभिंत बांधणे, अशी बरीच कामे अर्धवट आहेत. काही ठिकाणी या कामांना सुरुवातच झालेली नाही.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पुणेकरांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामध्ये काही जणांच्या बळीही गेला होता. पुण्यात अनेक नागरिकांच्या घरांत पाणी घुसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले होते. ओढ्या – नाल्या लगत असणाऱ्या सीमाभिंती वाहून गेल्या होत्या. त्यामुळे तातडीने यावर्षी पावसाळी कामे करण्यात यावी, असे धुमाळ यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पुण्यात पावसाने हाहाकार माजविला होता. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सहकार नगर, दांडेकर पूल, धनकवडी, स्वारगेट परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. या पाण्यात वाहनेही वाहून गेले होते.

अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने पावसाळी कामांना सुरुवात करण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.