Pune : बांधकाम व्यावसायिकांनी अगोदर सीमाभिंत बंधाव्यात; स्थायी समितीत चर्चा

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील ओढे – नाले लागत जी बांधकामे झालेली आहेत. त्या बांधकामांभोवती काही बांधकाम व्यावसायिकांनी सीमाभिंत बांधलेली नाही. पुणे शहरातील नदीकाठी जी बांधकामे चालू आहेत. त्या बांधकामांनाही बांधकाम व्यवसायिकांमार्फत सीमाभिंत बांधण्यात आलेली नाही. पुणे महापालिकेकडे सीमाभिंत बांधायला एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध नाही.

संबंधित बांधकाम व्यावसायिकांची अन्यत्र सुरू असलेली कामे थांबवून वरील ठिकाणच्या सीमाभिंत अगोदर बांधून घेण्यात याव्यात. त्यानंतरच अन्यत्र कामकाज सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समिती सदस्य उमेश गायकवाड यांनी दिला. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत आज चर्चा होऊन हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला, असे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

आंबील ओढ्याला महापूर आल्यानंतर सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले होते. त्यामुळे सीमाभिंत बांधून देण्याची मागणी या सोसायट्यांनी महापालिकेकडे केली आहे. पण, महापालिकेच्या तिजोरीत प्रचंड खडखडाट आहे. सीमाभिंत बांधणे हे बांधकाम व्यवसायिकांचेच काम आहे. तशी कायद्यात तरतूद आहे. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांना ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळत नसल्याचे उमेश गायकवाड यांनी ‘एमपीसी न्यूज’ शी बोलताना सांगितले. पण, बांधकाम व्यावसायिक सीमाभिंत बांधत नसल्याचे वास्तव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.