Pune : कालवा फुटीची कारणे शोधण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज- दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटलेल्या घटनेची कारणे शोधण्यासाठी व अशा घटना पुढे घडून नयेत, यावर उपाययोजना सुचविण्यासाठी राज्य शासनाने पाच सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती 15 डिसेंबर 2018 पर्यंत याविषयीचा अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, मुठा कालवा उंदीर आणि घुशींमुळे फुटला असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला होता. याची कारणेही समिती शोधणार आहे.

सप्टेंबर महिन्यात दांडेकर पूल येथे मुठा कालवा फुटल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये अनेक नागरिकांचे संसार वाहून गेले. या घटनेनंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कालवा फुटीबाबतची कारणे शोधण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जलविद्युत व गुण नियंत्रण विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे.

या समितीमध्ये पुणे शहराचे प्रांताधिकारी, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता, पुणे मनपा घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे उपायुक्त हे असणार आहेत. तर, कोयना संकल्प चित्र मंडळाचे अधिक्षक अभियंता हे सदस्य सचिव असणार आहेत. या समितीस लागणारी आवश्‍यक ती माहिती पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाने उपलब्ध करून द्यावी. तसेच समितीने वेळोवेळी सुनावणीस अथवा माहितीसह बोलविल्यास संबंधितांनी उपस्थित राहावे, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.