Pune: उद्यापासून शहरातील सर्व दुकानांचे  P-1 आणि P-2 पध्दत रद्द- आयुक्तांचे आदेश 

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील सर्व दुकानांचे पी 1 आणि पी 2 पध्दत रद्द करण्यात आली आहे. तशा प्रकारचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) दिले.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सर्व रस्त्यांवरील सर्व बिगर अत्यावश्यक दुकाने आता सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पी 1 आणि पी 2 पध्दत महापालिकेतर्फे लागू करण्यात आली होती. मात्र, अशा प्रकारे व्यवसाय करणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले होते. ही पध्दत रद्द करण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वस्तूंची दुकाने तीन महिने बंद होती. त्यामुळे व्यापाऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली होती. त्यामुळे पुणे शहरातील व्यापारी संघटनांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांना वारंवार निवेदने दिली.

राज्य शासनातर्फे ‘मिशन बिगीन अगेन’  अंतर्गत दिनांनाक 1 ऑगस्टपासून काही सवलती दिल्या. मुंबई महापालिकेनेही पी- 1 आणि पी- 2 पध्दती रद्द करून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. तसाच निर्णय आज पुणे महापालिकेतर्फेही घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सातत्याने सुरू आहे. त्यामुळे व्यवसाय करावा तरी कसा, असा प्रश्न व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. आता पी 1 आणि पी 2 पध्दत रद्द केल्याने व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.