Pune : उमेदवारी भरण्याचा कालावधी सुरू झाला तरीही सर्वच पक्षातील ‘इच्छुक’ गॅसवरच!

4 ऑक्टोबर शेवटची मुदत, 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुट्टी

एमपीसी न्यूज – निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर करून आता आठवडाभराचा कालावधी झाला आहे. 27 सप्टेंबर पासून उमेदवारी दाखल करण्यास सांगितले आहे. तरीही भाजप – शिवसेना, काँग्रेस – राष्ट्रवादी, मनसे यांनी उमेदवारी जाहीर न केल्याने विद्यमान आमदारांसोबतच प्रबळ ‘इच्छुक’ गॅसवर आहेत, असे समजत आहे.

शिवसेना – भाजप युती ठरत नाही. आज होणार, उद्या होणार, कधी होणार?, होणार… होणार.. , नुसत्या घोषणा सुरू आहेत. त्यामुळे मतदारसंघात प्रचार तरी कधी करायचा? असा सवाल इच्छुक उमेदवार विचारात आहेत.

काँगेस – राष्ट्रवादीचे उमेदवार तरी लवकर जाहीर करण्याची परिस्थिती होती, मात्र त्या पक्षाचे नेतेही युतीवर अवलंबून आहे. 4 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. त्यानंतर प्रचारासाठी केवळ 15 दिवस मिळणार आहे.

मतदारसंघातील 5 लाख मतदारांपर्यंत कसे पोचयचे?, याचा पेच उमेदवारांना पडला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांसह, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केवळ कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार, स्वपक्षातील असेल की, बाहेरून आलेला, याची कोणतीही खबर दिली नाही.

5 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होणार आहे. 7 ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच कोणता उमेदवार कोणत्या पक्षाकडून उभा आहे, ते चित्र स्पष्ट होणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. सर्वच उमेदवारांना 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 पर्यंत प्रचार करता येईल. तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.