Pune : कलाकारांना आर्थिक सहकार्य करण्याची शासनाने भूमिका घ्यावी – पालकमंत्री

‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा'ला भेट

एमपीसी न्यूज : व्यंगचित्र या छोट्याशा कलाकृतीतून समाजातील न्यून दाखविले जाते. समाज आणि राजकारण्यांना ठिकाणावर आणण्याचे आणि चिमटे काढून अंकुश ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणून व्यंगचित्रांना महत्त्व आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक, उच्चशिक्षण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.(Pune) विविध कला जोपासणाऱ्या कलाकारांना ठराविक काळ शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत केली जावी अशी आग्रही भूमिका मांडून विद्यापीठांनी व्यंगचित्रकलेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करावा आणि त्यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत करू अशी ग्वाही देखील दिली. 

जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त युवा संवाद सामाजिक संस्थेच्या वतीने व कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईन यांच्या सहकार्याने बालगंधर्व कलादालनात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री पाटील यांनी महोत्सवाला भेट देऊन तिसऱ्या दिवशीच्या सत्राचे उद्घाटन केले. व्यंगचित्रांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित, संजय मिस्त्री, युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड, व्यंगचित्रकार विश्वास सूर्यवंशी मंचावर होते.

पाटील म्हणाले, शासनात असूनही माझे असे मत आहे की, कलाकारांची यादी करून त्यांच्या अर्थाजनासाठी शासनाने सहकार्य करावे. ते पुढे म्हणाले, व्यंगचित्रांच्या माध्यमातून जनप्रबोधन करीत चिमटे काढून अंकुश निर्माण करणाऱ्या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न या महोत्सवाद्वारे करण्यात येत आहे, ही अभिनंदनीय गोष्ट आहे. कारण कलाकाराला व्यासपीठ मिळणे, कौतुक-शाबासकीची थाप मिळणे आवश्यक असते.(Pune) व्यंगचित्र ही माझ्या आवडीची कला असून वर्तमानपत्र वाचायला वेळ नसला तरी आज व्यंगचित्राद्वारे कोणाला चिमटा काढला हे मी नक्की बघतो. ते पुढे म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना विविधांगी शिक्षण दिले जावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी स्वायत्त विद्यापीठांनीही पुढाकार घ्यावा. व्यंगचित्रकारांच्या संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या आगामी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग असेल असे आश्वासन त्यांनी दिले.

PMPML : पीएमपीएलच्या प्रवाशांसाठी बससेवेत पाण्याची सुविधा

युवा संवाद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनराज गरड यांनी प्रास्ताविकपर स्वागत केले. या महोत्सवासाठी देश-विदेशातून अनेक व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे प्राप्त झाली पण जागेअभावी सर्वांना न्याय देता आला नाही. जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त भविष्यात सर्व व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांना न्याय देता यावा यासाठी साखळी पद्धतीने महोत्सव घेण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

कऱ्हाडमधील युवा कलाकार ऋषिकेश उपळावीकर याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे काढलेले अर्कचित्र त्यांना भेट दिले. संजय मिस्त्री यांनी कार्टूनिस्ट्‌‍स्‌‍ कंबाईनच्या उपक्रमांची माहिती दिली.(Pune) महोत्सवाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून भविष्यात संघटनेतर्फे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना शासनाने सहकार्य करावे, अशी अपेक्षा चारुहास पंडित यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्वागत धनराज गरड यांनी केले. मेघराज राजेभासेल, डॉ. आशिष विखार, अरविंद देशपांडे, सुभाष पाळीणकर, उमेश कवळे, हेमंत कुंवर, मैथिली पाटणकर, शरयू फरकंडे, चारुहास पंडित, संजय मिस्त्री, प्रकाश शिंदे आदींचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेंद्र भगत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.