Pune: दोन कोटी खंडणी प्रकरणी RTI कार्यकर्ता, निलंबित पोलीस व पत्रकारासह 5 जणांविरुद्ध गुन्हा

Pune: offence filed against 5 persons including a journalist, RTI activist and suspended police in 2 crore ransom case आरोपी महिलेने फिर्यादीचा बावधन येथील फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला. त्यानंतर इतर आरोपींना हाताशी धरून फिर्यादीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली, असा आरोप आहे.

एमपीसी न्यूज – खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरुंगात पाठविण्याची धमकी देत एका ज्येष्ठ नागरिकाला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून पुण्यात आरटीआय कार्यकर्ता, निलंबित पोलीस व पत्रकारासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

आरटीआय कार्यकर्ता रवींद्र लक्ष्मण बराटे, पुणे शहर पोलीस दलातील बडतर्फ पोलिस कर्मचारी शैलेश जगताप, अमोल सतीश चव्हाण आणि दीप्ती अनिल आहेर व पत्रकार देवेंद्र फुलचंद जैन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सुधीर वसंत कर्नाटकी (वय 64) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीप्ती आहेर यांनी फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा फायदा घेत बावधन परिसरातील एक फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतला. एवढ्यावर न थांबता आरोपी महिलेने इतर आरोपींना हाताशी धरून फिर्यादीकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

देवेंद्र जैन, शैलेश जगताप, अमोल चव्हाण, रवींद्र बराटे या सर्वांनी आरोपीला वारंवार फोन करून, प्रत्यक्ष भेटून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत दोन कोटी रुपये खंडणी मागितली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनंतर कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बालवडकर करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.