BNR-HDR-TOP-Mobile

Pune : चोरट्यांनी दिवसाढवळ्या एसबीआय बँकेतून 28 लाखांची रोकड पळवली

कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलीत करून साधली संधी; पोलिसांना टिळक रस्ता परिसरात आढळली 'ती' बॅग, मात्र पैसे गायब

एमपीसी न्यूज – पैसे भरण्याच्या बहाण्याने आलेल्या चोरटयांनी भारतीय स्टेट बँकमध्ये कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलीत करून २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग पळवली. ही घटना आज (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास पुण्यातील शंकरशेठ रोडवरील सेव्हन लव्हज चौकात घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. कालांतराने पोलिसांना ‘ती’ बॅग टिळक रस्ता परिसरात आढळली मात्र, बॅगेतील पैसे गायब झाले आहेत.

याप्रकरणी बँक व्यवस्थापकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेव्हन लव्हज चौकात भारतीय स्टेट बँक आहे. गुरुवारी दिवसभर जमा झालेली २८ लाख रुपयांची रोकड असलेली बॅग कॅशियरच्या काऊंटरजवळ ठेवली होती. सकाळी बॅंक उघडल्यानंतर ग्राहकांची रांग लागली होती. या रांगेत दहा ते बाराजण उभे होते.

  • त्यांनी कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलीत केले. तर, दोन चोरट्यांनी पैशाने भरलेली ती बॅग उचलली. त्यानंतर ते दोघे बाहेर निघून गेले. त्यांच्या पाठीमागे इतर साथीदारही बाहेर पडले. चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर बॅंक कर्मचाऱ्यांची धांदल झाली. त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस आणि खडक पोलिसांनी घटनास्थळी पोहचले.

पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यात त्यांना दोघे स्वारगेटच्या दिशेने चालत गेल्याचे दिसले. तर इतर लोकही त्यांच्या पाठीमागे गेल्याचे दिसले. बॅग चोरतानाचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बॅगेतील पैसे घेऊन चोरट्यांनी पोबारा केला असून ती बॅग टिळक रस्ता परिसरात फेकून दिली आहे. ती पैशांची बॅग टिळक रस्त्यावर सापडली आहे.

  • याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चोरट्यांना पकडण्यासाठी गुन्हे शाखा आणि खडक पोलिसांचे पथक रवाना केले आहे.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3