pune : राममंदिर पायाभरणीनिमित्त घरोघरी दिवाळी साजरी करा, पण कोरोनाचे भान ठेवा – चंद्रकांत पाटील

घरामध्ये सर्व कुटुंबियांसोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा. ; Celebrate Diwali from house to house for Ram temple foundation, but be aware of Corona - Chandrakant Patil

एमपीसीन्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिराचा पायाभरणी समारंभ दि. 5 ऑगस्ट रोजी होत असून आयुष्यातील हा महत्त्वाचा दिवस सर्वांनी वैयक्तिक पातळीवर घरोघरी दिवाळीसारखा साजरा करावा. मात्र, सामूहिक उत्सव टाळावा आणि कोरोनाचे भान ठेवावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी राज्यातील जनतेला व भाजपाच्या कार्यकर्त्यांना केले.

पाटील म्हणाले की, दि. 5 ऑगस्ट हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा दिवस आहे. अयोध्या येथे श्रीरामजन्मस्थानी भव्य मंदिर व्हावे यासाठी आपण जगलो. त्या राममंदिराची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

मंदिराच्या पायाभरणीचा दिवस एरवी आपण खूप धुमधडाक्यात साजरा केला असता पण कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता सर्वांनी वैयक्तिक पातळीवर उत्सव साजरा करावा.

पाटील पुढे ते म्हणाले की, मंदिराच्या पायाभरणी समारंभाचा दिवस म्हणजे घरात दिवाळी आहे, असे समजून खूप मोठ्या प्रमाणात साजरा करावा. आपल्या घरावर रोषणाई करावी, गुढी उभारावी, घरावर कंदिल लावावा, घरासमोर पणत्या लावाव्यात आणि रांगोळी काढावी.

घरामध्ये सर्व कुटुंबियांसोबत टीव्हीवर भूमीपूजनाचा कार्यक्रम पाहावा.

दि. 5 ऑगस्टच्या समारंभाचा सामूहिक उत्सव टाळावा. सामूहिक उत्सव साजरा करणार असू तर त्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी.

सामूहिक उत्सवामध्येसुद्धा कोरोनाचे भान ठेवावे. ढोलताशे आणि फटाके बिलकूल नकोत, असेही त्यांनी सांगितले.

अमितभाई लवकर बरे होवोत

केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातमीमुळे मनामध्ये खूप चिंता निर्माण झाली. कोल्हापूरच्या अंबाबाईवर अमितभाईंचीही श्रद्धा आहे. अमितभाईंच्या तब्येतीला लवकर आराम मिळो व ते त्यांच्या कामाच्या नेहेमीच्या झपाट्याने पुन्हा कार्यरत होवोत, अशी प्रार्थना पाटील यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.