Pune : ‘स्त्रोतस्’ मैफलीतून दिला गुरूंच्या स्मृतींना उजाळा

नृत्यभारती कथक डान्स अकॅडमी आणि प्रकृति कथक नृत्यालय यांच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – ही कथक मैफल पारंपारिक सादरीकरणापासून जरा हटके होती. दर्दी रसिकांचीच येथे गर्दी होती. नामवंत वाद्यवृंद कलाकार कलामंचावर होते. कथकमधील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा सहवास आणि आशिर्वाद लाभलेल्या ज्येष्ठ शिष्यांची सभागृहात मांदियाळी होती. परंतु, अवगत कलेतील निपुणता व ज्येष्ठत्व सिद्ध करण्याचा कोणाचाच येथे अट्टाहास नव्हता. मैफिलीच्या प्रारंभापासून ते सांगतेपर्यंत रसिकांनी केवळ अनुभवला तो शिष्याने गुरूप्रती व्यक्त केलेला कृतज्ञता भाव.

नृत्यभारती कथक डान्स अकॅडमी आणि प्रकृति कथक नृत्यालय यांच्या संयुक्त संकल्पनेतून ‘स्त्रोतस्’ ही मैफल घेण्यात आली. यावेळी लखनौ घराण्याचे प्रसिद्ध नर्तक व पं.मोहनराव कल्याणपूरकर यांचे शिष्य सुभाषचंद्र व पं. रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या नीलिमा अध्ये यांनी आपल्या नृत्यातून गुरूंच्या असंख्य स्मृतींना उजाळा दिला.

  • यावेळी पद्मश्री सुनील कोठारी, रोहिणी ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे, सुनीता पुरोहित आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुभाषचंद्र यांनी कथक कला आत्मसात करत असणाऱ्या नवीन पिढीपुढे त्याकाळातील गुरू शिष्यांचे नाते उलगडण्यावर भर दिला.

यावेळी रसिकांशी संवाद साधताना ते म्हणाले की , पं. मोहनरावांचे व्यक्तिमत्व अदभूत आणि अथांग होते. त्यांना पहिल्यांदा नृत्य करताना पाहिले तेव्हा मी अचंबित झालो. तुलेनेने मला त्यांचा अत्यल्प सहवास लाभला पण, तो जेवढा लाभला तो माझ्यासाठी विलक्षण होता. त्यांच्याकडून मला किती आणि काय शिकायला मिळाले, याचा विचारही कधी मनाला स्पर्शून गेला नाही. पण, त्यांच्याकडून मी जे काही शिकू शकलो. त्यात मी नक्कीच तृप्त आणि समाधानी आहे.

  • मोहनरावांचा मी शिष्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. कलेतील विद्वत्ता आणि प्रगल्भता प्राप्त करूनही मोहनरावांच्या मुखात कायमच त्यांच्या गुरूंची नावे असायची. त्याचा मोठेपणा, समर्पण आजकालच्या स्वार्थी पिढीला उमगणार नाही, अशी खंत देखील सुभाष यांनी यावेळी व्यक्त केली.

संवाद साधतानाच आपल्या नृत्याची झलकही त्यांनी रसिकांना दाखविली. त्यांनी सादर केलेल्या रुकसार आणि तलवार गत याला रसिकांची विशेष वाहवा मिळाली. शंभू महाराज यांची सुप्रसिद्ध गत बैठ्या स्वरुपात त्यांनी पेश केली. तर थाट, आमत, गणेश परण, ‘कौन गली गयो श्याम ‘ , ‘काहे रोकत डगर प्यारे,’ यातून नृत्य आणि अभिनयाच्या अंगाचेही विलक्षण दर्शन त्यांनी रसिकांना घडविले.

  • कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात नीलिमा अध्ये यांनी आखलेल्या अनोख्या युगल नृत्यातून दोघांना एकाच स्त्रोताकडून लाभलेल्या नृत्यातले साम्य आणि वेगळेपणही दिसून आले. सुभाषचंद्र आणि नीलिमा अध्ये यांनी कृष्ण वंदना प्रस्तुत केली. कथक परंपरेप्रमाणे तीन तालामध्ये, थाट, आमद, बंदिश सादर करताना दोघांच्या गुरूंचे प्रतिबिंब अगदी स्वच्छ दिसले. रोहिणीताईंचे प्रसिद्ध परण व अर्धनारीनटेश्र्वर स्तोत्र यातून रोहिणीताईकडून लाभलेला लालित्यपूर्ण वारसाच जणू नीलीमाताईंनी उलगडला.

तर, मैफलीच्या सांगतेला सुभाषचंद्र आणि नीलिमा अध्ये यांनी सादर केलेल्या भजनातून त्यांनी गुरुंकडून आत्मसात केलेले कलेचे बारकावे व सूक्ष्म अभ्यासाचे विलोभनीय दर्शनच रसिकांना घडले. रसिकांना ह्या भाजनाने फारच भारावून टाकले.

  • यावेळी पं. अरविंद कुमार आजाद (तबला), माधुरी जोशी (गायन), अजय पराड (संवादिनी), मयुर महाजन (गायन) , रुद्राक्ष साखरीकर (सारंगी), आसावरी पाटणकर (पढंत) यांनी समर्पक साथ दिली. ही संकल्पना स्तुत्य या धर्तीवर मैफल झाली पाहिजे अशी भावना कोठारी यांनी यावेळी व्यक्त केली.

शिष्याने बासरी सारखं असावं
‘शिष्य कसा असावा’ हे अगदी सोप्या भाषेत सांगताना त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलेल्या उदाहरणाची सुभाषचंद्र यांना आठवण झाली. ते म्हणाले शिष्याने बासरीसारख असाव. आतून मोकळं, पोकळ म्हणजे गुरूकडून भरभरून आत्मसात करू घेता येतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.