BNR-HDR-TOP-Mobile

Pune : शहरात विविध संस्था, संघटना आणि शाळांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा

एमपीसी न्यूज – पुणे शहरात विविध संस्था आणि संघटना, शाळांच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. ‘धर्मसेवा प्रतिष्ठान’ न्यास नियमितपणे समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. याचाच एक भाग आणि ‘जागतिक योग दिना’चे औचित्य साधून पुणे येथील धनकवडी भागातील बालाजीनगर येथील ज्ञानेश प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयामध्ये धर्मसेवा प्रतिष्ठान न्यासाच्या वतीने योग शिबिर घेण्यात आले. प्राथमिक विद्यालयातील इयत्ता सातवी आणि माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवी आणि नववी या वर्गातील ११४ विद्यार्थी शिबिराला उपस्थित होते. सर्व विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

यावेळी योगशिक्षिका वैदेही कुलकर्णी यांनी ‘सुदृढ आणि निरोगी रहाण्यासाठी नियमित व्यायाम करण्याचे महत्व’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच नियमित करता येतील असे योगप्रकारही त्यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह शिकवले.

  • ज्ञानेश विद्यालयाच्या ज्योती किसन यादव, हर्षदा राजेंद्र गावडे, वैशाली रमाकांत देशपांडे यावेळी सहभागी झाल्या होत्या. अनुराधा तागडे आणि प्रतिभा कोळेकर यांनी शिबिर आयोजन करण्यात सहभाग घेतला.

आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त शि. प्र. मंडळी, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशनचे (विकासा) आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमात जवळपास ३००० विद्यार्थी, शिक्षक व सीए इन्स्टिट्यूट सहभागी झाले होते.

  • यावेळी शि. प्र. मंडळीचे अध्यक्ष अ‍ॅड.एस. के. जैन, स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे आदी उपस्थित होते.

शि. प्र. मंडळी संचालित सर्व शाळांचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. पतंजली योग समितीचे प्रितेश केले यांनी योग प्रात्यक्षिके करून घेतली. योग दिवस जगभर साजरा होत आहे. आपले आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी, स्मरणशक्ती वाढण्यासाठी रोज योगाभ्यास केला पाहिजे. आजचा दिवस त्यासाठी प्रोत्साहित करत असतो, असे अ‍ॅड. एस. के. जैन यावेळी म्हणाले.

  • ‘आयसीएआय’च्या वतीने सीए, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी फडके संकुल येथेही योगवर्गाचे आयोजन केले होते. हा योगवर्ग १ जून ते ३० जून या कालावधीत होत असल्याचे अभिषेक धामणे यांनी सांगितले. योग दिवसाच्या निमित्ताने शि. प्र. मंडळींच्या सहयोगाने ३००० विद्यार्थ्यांसाठी योग्य प्रात्यक्षिके आयोजिण्याची संधी मिळाली. सर्वांसाठी चटई आणि लाडूचे वाटप करण्यात आल्याचे ऋता चितळे यांनी सांगितले.

Advertisement