Pune : केंद्रीय पथकाची बारामतीला भेट; पथकाकडून ‘बारामती पॅटर्न’चे कौतूक

एमपीसी न्यूज – कोरोनावर मात करण्‍यासाठी राबविण्‍यात येणारा   ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत केंद्रीय पथकाने व्‍यक्‍त केले. आज, गुरुवारी (दि. 23) बारामती येथे केंद्रीय पथकातील डॉ. अरविंद अलोणी व डॉ. पी.के.सेन यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाची पाहणी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे व तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे यांनी त्यांना कोरोनाच्या‍ पार्श्वभूमीवर देण्‍यात येत असलेल्या आरोग्यविषयक सेवा सुविधांची माहिती दिली. यानंतर त्यांनी बारामतीमध्ये ज्या भागात कोरोनोचे रूग्ण  आढळले आहेत त्या भागाचीही पाहणी केली.

पाहणी नंतर डॉ. अलोणी व डॉ. सेन  यांनी प्रशासकीय अधिका-यांसोबत बैठक घेतली. बैठकीसाठी उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उपमुख्य  कार्यकारी अधिकारी अमर माने,  प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, सिल्‍व्‍हर ज्‍युबिली रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी मनोज खोमणे, नगरपरिषद मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर उपस्थित होते. यानंतर केंद्रीय पथकाच्या सदस्‍यांनी आशाताईंशीही (आशा वर्कर्स) संवाद साधत माहिती घेतली.

या बैठकीमध्ये  बारामती तालुक्यात कोरोनाबाबत करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचे सादरीकरण दाखविण्यात आले. सादरीकरण पाहून डॉ. अलोणी व डॉ. सेन यांनी ‘बारामती पॅटर्न’ खूपच प्रभावी असल्याचे सांगून तो इतरांसाठीही मार्गदर्शक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच त्यांनी सर्व शासकीय अधिका-यांचे कौतुकही केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.