Pune : मंगळसूत्र हिसकावून पळून जाणाऱ्या दोन चोरट्यांच्या 24 तासात आवळल्या मुसक्या

एमपीसी न्यूज – दुचाकीवरून येऊन बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळून गेलेल्यादोन सराईत चोरट्याना भारती विद्यापीठ पोलिसांनी 24 तासांच्या आत अटक केली.

किशोर शंकर मोरे (वय 32, रा. गुलटेकडी), आकाश गोविंद गायकवाड (वय 25, रा. पर्वती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी धनश्री सुनील गोसावी(वय 40, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनश्री गोसावी या 29 ऑक्टोबर रोजी बंगल्याच्या गेटजवळ उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून कात्रज तलावाच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या गुन्ह्याच्या तपास करताना पोलिसांनी तात्काळ कात्रज परिसरातील एकूण 41 सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासून चोरट्यांनी वापरलेल्या ऍक्टिव्ह गाडीची तपासणी सुरू केली. त्यानंतर खबऱ्याकडून साखळी चोरी करणारे किशोर आणि आकाश हे दोघेजण असल्याची माहिती मिळाली व त्याप्रमाणे त्या दोघांचा शोध घेऊन पोलिसांनी हिसका दाखवताच दोघांनी मंगळसूत्र चोरल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण आणि ऍक्टिवा गाडी असा एकूण 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.