Pune : महापालिका नवनियुक्त आयुक्तांसामोर कोरोना संकटाचे आव्हान

 Challenge of Corona Crisis before the newly appointed Municipal Commissioner विक्रम कुमार यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – पुण्यातील कोरोना संकट कमी करणे हे नवनियुक्त आयुक्त विक्रम कुमार यांच्या समोर मोठे आव्हान आहे. त्यांनी रविवारी मावळते आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) रुबल अगरवाल व अन्य अधिकारी उपस्थित होते. 

पुणे शहरात कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. रोज 4 हजार 500 चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे 1 हजार रुग्णांची रोज भर पडत आहेत. सध्या शहरात कोरोनाचे 27 हजारांच्या आसपास रुग्ण गेले आहेत. तर, 17 हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 10 हजार आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधावा लागणार आहे. हे रुग्णालय दाद देत नसल्याने शेखर गायकवाड यांनी कारवाईचा बडगा उगारला होता. जुलै महिन्यात आणखी कोरोना रुग्ण वाढणार आहेत. त्यामुळे या रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, महापालिका प्रशासनाला कामाला लावणे, अशा विविध गोष्टींना नवीन आयुक्तांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.

कोरोनाच्या अभूतपूर्व संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्य शासन आणि पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वय ठेवावा लागणार आहे. महापालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घ्यावा लागणार आहे. शेखर गायकवाड यांनी पुरवणी अंदाजपत्रक मांडणार असल्याची भूमिका घेतली होती. त्याला सत्ताधाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. ‘स’ यादीलाही कात्री लावण्याचे नियोजन सुरू होते. त्यामुळे नागरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता नवीन आयुक्त काय निर्णय घेणार, याची उत्सुकता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.