Pune : चंद्रकांतदादांनी माघार घेऊन ब्राह्मण महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा; ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांची मागणी

एमपीसी न्यूज – चंद्रकांत पाटील विधानपरिषदेवर जाऊ शकतात, राज्यसभेत जाऊ शकतात, केंद्रात मंत्री होऊ शकतात.त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी माघार घेऊन ब्राह्मण महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. परंतु स्थानिक रहिवाशी नसल्याच्या कारणावरून त्यांना विरोध होत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मयुरेश अरगडे चंद्रकांत पाटलांच्या विरोधात कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यामुळे ब्राह्मण समाजाच्या मतात विभागणी होऊन त्याचा फटका भाजपला बसू शकतो. त्यामुळे मनधरणी करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली..यावेळी ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, प्रदेश अध्यक्ष मोहिनी पत्की, पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे उपस्थित होते.

चर्चेअंती अद्यापतरी यावर काही तोडगा निघाला असेल असे वाटत नाही, कारण बैठकीनंतर ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडताना चंद्रकांतदादांनी माघार घेऊन ब्राह्मण महासंघाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, अशी मागणी केली. परंतु असे असले तरी उद्या सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून उद्या निर्णय जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना ब्राह्माण महासंघाचा माझ्या उमेदवारीला विरोध नाही तर. त्यांच्या काही मागण्या आहेत ज्या सरकारने अद्याप पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा रोष सरकारवर आहे. पण, सध्या आचारसंहिता असल्यामुळे त्यांच्या मागण्यांवर निर्णय होत नाही. आचारसंहिता समाप्त होताच आम्ही त्यांच्या मागण्यांचा नक्कीच विचार करू. त्यामुळे ब्राह्मण महासंघाचा उमेदवार माघार घेईल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.