Pune : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द खरा करून दाखविला !

मुरलीधर मोहोळ यांना मिळाले महापौरपद ; प्रा. मेधा कुलकर्णी यांना कोणते पद मिळणार ?

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द आज खरा करून दाखविला. कोथरूड विधानसभा निवडणुकीत तीव्र इच्छुक असलेल्या नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना महापौरपदावर काम करण्याची संधी देण्यात आली. आता माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांना कोणते पद मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. मोहोळ यांच्या सोबतच कुलकर्णी यांचीही लवकरच नाराजी दूर करण्याचा शब्द पाटील यांनी दिला होता.

मुरलीधर मोहोळ यांचे महापौरपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी महापालिकेत जोरदार घोषणाबाजी केली. चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघांत विजयी करण्यात मोहोळ यांचा सिंहाचा वाटा आहे. या संपूर्ण निवडणुकीची जबाबदारीच मोहोळ यांच्यावर टाकण्यात आली होती. त्याची परतफेड म्हणूनच मोहोळ यांना महापौरपदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे पाटील यांच्या पाठोपाठ खासदार गिरीश बापट, संजय काकडे, शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मोहोळ यांच्या नावाला पसंती दिली. तर, भाजपने धक्कातंत्राचा वापर करीत उपमहापौर पदासाठी नगरसेविका सरस्वती शेंडगे यांना संधी दिली. आरपीआयचे (आठवले गट) नगरसेवक म्हटले तरी ते भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. या पाचही नगरसेवकांना मागीलतीन वर्षांच्या सत्तेच्या काळात लाभ देण्यात आला. अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधीत आरपीआयकडे उपमहापौरपद राहिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.