Pimpri News : जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज – हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे एक जानेवारी रोजी जयस्तंभ अभिवादन कार्यक्रम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारी घेत तयारी केली आहे. दरम्यान, परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबत आदेश दिले आहेत. हे बदल गुरुवारी( दि. 31) रात्री बारा  ते शुक्रवारी ( दि.1) रात्री बारा वाजेपर्यंत   असणार आहेत.

वाहतुकीतील बदल खालीलप्रमाणे –

# चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद.

# सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक वाहने ही हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आनंदी, चाकणकडे जातील.

# मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक टेम्पो, ट्रक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्गे अहमदनगरकडे जातील.

# मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने, वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगरकडे जातील.

# चाकण तळेगाव चौक – शेल पिंपळगाव – बहुळ – साबळेवाडी अशी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद राहील.

# आळंदी – शेलपिंपळगाव – बहुळ – साबळेवाडी अशी दोन्हीकडील वाहतूक बंद राहील.

# आळंदी – मरकळ – कोयाळी – शेलपिंपळगाव – बहुळ – साबळेवाडी दोन्ही बाजूकडील वाहतूक बंद राहील.

# नाशिक रोडकडून येणारी तळेगावकडे येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगाव-चाकण चौकातून मोशी व तळेगावकडे जाऊ शकतील.

# देहूरोड येथे मुंबई जुन्या महामार्गाने पुण्याकडे येणारी वाहने सेंट्रल चौकातून निगडी – पिंपरी-चिंचवडकडे न जाता सेंट्रल चौकातून रावेत मार्गे वाकड नाका – चांदणी चौकातून पुण्याकडे जातील.

# मुंबईकडून द्रुतगती मार्गाने पुण्याकडे जाणारी वाहने उर्से टोलनाका येथून रावेत द्रुतगती मार्गाने सरळ वाकड नाका – राधा चौक येथून पुण्याकडे जातील. (या वाहनांना निगडी, मुकाई चौकाकडे जाण्यास बंदी आहे).

# मुंबईकडून द्रुतगती मार्गाने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहने वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोलनाक्यावरून देहूरोडकडे जाणा-या बाह्यवळण रस्त्याने जातील.

# नाशिक व तळेगावकडून येणारी वाहने तळेगाव चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता आळंदी फाटा येथून आळंदी मार्गे पुणे शहरात जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.