Pune : पथारी व्यावसायिकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये पन्नास टक्क्यांनी कपात

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहरातील रस्ते व चौकांमधील पथारी, हातगाडी आणि छोट्या -मोठ्या स्टॉलधारकांना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये तब्बल पन्नास टक्क्यांनी कपात करण्याचा प्रस्ताव नुकताच स्थायी समितीने मंजूर केला आहे.

शहरातील रस्ते, चौकांमधील पथारी, हातगाडी आणि छोटे-मोठे स्टॉलधारक यांना पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शुल्क आकारून परवाने दिले जातात. सध्या छोट्या स्टॉलधारकांना दर महिन्याला दोन हजार रुपये तर मोठ्या स्टॉलधारकांना सहा हजार रुपये भाडे, शुल्क आकारण्यात येत आहे. पालिकेच्या वतीने पथारी व्यावसायिकांचे अ, ब, क असे वर्गीकरण करण्यात आले असून, त्यानुसार विविध प्रकारचे भाडे आकारण्यात येते. अ प्लस आणि अ मध्ये येणार्‍या पथारी व्यावसायिकांना प्रति दिवस अनुक्रमे दोनशे आणि शंभर रुपये, ब मध्ये येणार्‍या व्यावसायिकांना प्रति दिवस 50 रुपये आणि क मध्ये येणार्‍या व्यावसायिकांना 25 रुपये प्रति दिवस भाडे आकारण्यात येते.

पालिकेकडून आकारण्यात येणारे शुल्क अवाजवी असून, ते भरण्यासाठी व्यावसायिकांची तयारी नसते. यामुळे धकबाकी देखील वाढत आहे. हे शुल्क त्वरित कमी करण्याची मागणी केली जात होती. यामुळे हे भाडे कमी करावे या संदर्भातील ठराव स्थायी समिती समोर ठेवला. त्यानुसार स्थायी समितीने यामध्ये सरासरी पन्नास टक्के कपात करत लहान स्टॉल धारकांना दर महा केवळ 1 हजार 500 रुपये आणि मोठ्या स्टॉल धारकांकडून दर महा 4 हजार रुपये भाडे घेण्यात यावे, असा ठराव सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती समीतीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.