Pune : मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी 270 किलो वजनाचा हार

एमपीसी न्यूज- मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस महाजनादेश यात्रेसाठी आज, शनिवारी पुणे शहरात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आमदार योगेश टिळेकर यांनी हडपसर गाडीतळ येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.  मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी तब्बल 270 किलो वजनाचा फुलांचा हार तयार करण्यात आला आहे. शेवाळवाडी येथून महाजनादेश यात्रेला सुरवात होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मार्केटयार्ड फुल बाजार मधील फुलांचे व्यापारी व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हरिभाऊ कामठे यांनी हा हार तयार केला आहे. या मध्ये 100 किलो हिरवी पाने आणि 170 किलो झेंडू व इतर फुलांचा वापर केला आहे. 15 महिला कामगार आणि 10 कारागीर यांनी मेहनत घेऊन या महाकाय हाराची निर्मिती केली आहे.या हाराला योग्य गोल आकार यावा या साठी 6 सायकलच्या चाकांची रिम वापरण्यात आली आहे.

या बाबत माहिती देताना हरिभाऊ कामठे म्हणाले,” यापूर्वी गुजरात मध्ये 160 किलो वजनाचा हार बनविण्यात आला होता त्याचा विक्रम मोडीत काढून लिम्का वर्ल्ड बुकमध्ये नोंद होण्यासाठी या हाराची निर्मिती केली आहे. आज सायंकाळी आमदार योगेश टिळेकर हडपसर येथे क्रेनचा वापर करून मुख्यमंत्र्यांना हा हार घालणार आहेत”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like