Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Chief Minister Uddhav Thackeray will visit Pune tomorrow on the backdrop of Corona

एमपीसी न्यूज – पुणे शहर, पिंपरी – चिंचवड, जिल्ह्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी ( दि. 30 ) पुणे दौऱ्यावर येत आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात 2 मुख्यमंत्री असल्याचा घणाघाती आरोप केला होता. 1 मुख्यमंत्री ‘मातोश्री’त तर दुसरे सध्या राज्यात फिरत  असल्याची टीका मुख्यमंत्र्यांवर केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांचा पुणे दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे.

मुख्यमंत्री ठाकरे हे गुरुवारी सकाळी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते कोरोना निर्मूलन आढावा बैठक घेणार आहेत. संपूर्ण दिवसभर पुण्यातील आढावा घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पुण्याहून ते प्रयाण करतील. पुणे दौऱ्यात मुख्यमंत्री पुणेकरांना काय दिलासा देणार, याची उत्सुकता आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनीही वारंवार बैठका घेऊन कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात कोरोना संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती घेतली जाईल.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकार पुण्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप केला होता.

पुण्यात क्वारंटाइन सेंटर, आयसीयू बेड वाढवण्याची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुणे महापालिकेला आर्थिक मदत करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या काळात प्रचंड खर्च वाढत असल्याने मुख्यमंत्री पुण्याला काय मदत करणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.