Pune : ‘चुडामणी प्रदानम’ पौराणिक नृत्यनाटिकेने जिंकली पुणेकरांची मने !

नृत्यातून रंगले रामायणातील प्रसंग

एमपीसी न्यूज- रामायणातील प्रसंग नृत्यातून पुढे आणणाऱ्या ‘चुडामणी प्रदानम’ या पौराणिक नृत्यनाटिकेला शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी पुणेकर रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘नृत्ययात्री ‘ संस्थेतर्फे चेन्नई च्या ‘कलाक्षेत्र फौंडेशन’च्या सहकार्याने चार वर्षांनी ही नृत्यनाटिका पुणेकर रसिकांच्या भेटीला आली. या नृत्य नाटिकेचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. चेन्नईच्या नृत्य गुरु रुक्मीणीदेवी अरुंदळे यांनी 50 वर्षापूर्वी ही नृत्य नाटिका प्रथम रंगमंचावर आणली.

या नृत्यनाटिकेत चेन्नईचे 40 कलाकार सहभागी झाले. ‘कलाक्षेत्र ‘ संस्थेच्या दिग्दर्शक रेवथी रामचंद्रन तसेच पुण्याच्या सांस्कृतिक विश्वातील अनेक मान्यवर रामायणावर आधारित या पौराणिक नृत्य नाटिकेचा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. अशोक वाटिकेत कैद सीतेला भेटून धीर देऊन रामाला क्षेम कुशल सांगण्यासाठी हनुमान परत निघाले तेव्हा चुडामणी हे रत्न सीतामाई हनुमानाजवळ खूण म्हणून देते. सुग्रीवासह राम लंकेस सीतामाईच्या सोडवणुकीसाठी येतील असे सांगून हनुमान लंकेतून निघतात. जटायू वधापासूनचे ही अनेक प्रसंग या नृत्य नाटिकेत अनुभवायला मिळाले.

डॉ. अनुराग कश्यप ( प्राचार्य, भानुबाई नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ),’ लोकमान्य मल्टीपर्पज क्रेडिट सोसायटी ‘ चे वरिष्ठ व्यवस्थापक विनय पुराणीक , ‘नृत्ययात्री ‘ संस्थेच्या प्रमुख मेघना साबडे, मनीष साबडे, नगरकर उपस्थित होते. मेघना साबडे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. परिमल फडके यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.