Pune: ‘मॉर्निंग वॉक’ला बाहेर पडलेल्या अतिउत्साही पुणेकरांना मिळाली व्यायामाची शिक्षा

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचा प्रदूर्भावाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी जवळपास निम्मे शहर सील केले असताना मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. शहराच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला असताना स्वतःचे आरोग्य कमवायला निघालेल्या या ‘मॉर्निग वॉक’वीरांकडून पोलिसांनी चक्क व्यायामच करून घेतला. 

पुण्यात बुधवारी 63 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. हा गेल्या दीड महिन्यातला सर्वात मोठा आकडा आहे. अशावेळी नागरिकांनी खबरदारी पाळणे गरजेचे आहे. कोणत्याही कारणास्तव कोणीही घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासन व पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे. तरी देखील लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून  बाहेर पडणाऱ्या नागरिकांना पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

पुणे शहरातील बिबवेवाडी, हडपसर, कोंढवा, चतुःश्रुंगी, दत्तवाडी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी संबंधितांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली घराबाहेर पडलेल्या या अतिउत्साही पुणेकरांना पोलिसांनी रांगेत उभे करून भर रस्त्यावर त्यांच्याकडून घाम निघेपर्यंत चांगला व्यायाम करून घेतला. त्यामुळे त्यांची व्यायामाची हौसही कायमची फिटली असणार शिवाय या सर्वांवर संचारबंदी भंगाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या कारवाईनंतर तरी पुणेकर काही बोध घेतील, अशी आशा करायला हरकत नाही. पोलिसांच्या कारवाईचा पुणेकरांवर कितपत परिणाम झाला, हे उद्या सकाळी मॉर्निंग वॉकच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्या पुणेकरांच्या संख्येवरून नक्कीच लक्षात येईल. मॉर्निंग वॉकच्या नावाखाली घरातून बाहेर पडून स्वतःचा जीव आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्याऐवजी घरातच जमेल तेवढा व्यायाम करून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.