Pune: कोकणवासियांच्या मदतीसाठी नागरिकांनी भाजपला साथ द्यावी, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Pune: Citizens should support BJP to help Konkan people, appeals Chandrakant Patil भाजपने तातडीची मदत म्हणून कोकणवासियांसाठी काही गाड्या भरून साहित्य मुंबईतून पाठवले.

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील बांधवांना थेट मदत करण्यासाठी भाजपने निर्धार केला असून या कामात नागरिकांनी पक्षाला साथ द्यावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

भाजपने तातडीची मदत म्हणून कोकणवासियांसाठी काही गाड्या भरून साहित्य मुंबईतून पाठवले. आता भाजपने कोकणवासियांच्या मदतीसाठी पुढचे पाऊल टाकायचे ठरविले आहे.

घरांवर लावण्यासाठी पत्रे, सौरकंदिल आणि इतर साहित्य देण्याचा भाजपचा निर्धार आहे. कोकणातील फळबागा पुन्हा उभ्या राहण्यासाठी एक लाख रोपे वाटण्याचा पक्षाचा संकल्प आहे.

त्यामुळे सर्व नागरिक बंधू – भगिनींनी कोकणच्या मदतीसाठी पुढे यावे आणि भाजपला साथ द्यावी. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील बांधव संकटात आहेत. घरे उद्धवस्त, झाडे जमीनदोस्त, वीज बंद, जनजीवन ठप्प, मासेमारी नौकांचे नुकसान, रहायला घर नाही, अशा अवस्थेत कोकणातील सामान्य माणूस सापडला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपचे नेते आणि लोकप्रतिनिधींनी कोकणातील संकटग्रस्त भागाला भेट देऊन जनतेचे दुःख जाणून घेतले.

त्यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आणि कोकणवासियांच्या समस्या सोडविण्यासाठी 19 मागण्या केल्या आहेत. त्यासोबत पक्षाच्या पातळीवर संकटग्रस्तांना थेट मदत करण्यात येत आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.