Pune City Crime News : रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून कोयत्याने वार करत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून सराईत गुन्हेगारांनी एका तरुणाला भर रस्त्यात आडव त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तळजाई वसाहत येथे रविवारी सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.

शैलेश महादेव पवार (वय 25) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली असून आरोपी सोनू शिंदे, अनिकेत उर्फ अशोक कांबळे, आदित्य उर्फ शेंड्या ढाकले, सोन्या ढाकले, विनायक गायकवाड आणि त्याचे तीन अनोळखी साथीदार विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी सोनू शिंदे आणि विनायक गायकवाड हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपीचे किरकोळ भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शैलेश पवार याला भर रस्त्यात आडवले. त्यानंतर शिवीगाळ करत आरोपी सोनू शिंदे यांनी पाठीमागून फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तर इतर आरोपींनी फिर्यादीला स्टंप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आज याला येथेच खल्लास करू असे म्हणत परिसरात दहशत निर्माण करीत फिर्यादीला ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.