Pune City Crime News : कर्ज वसुलीसाठी अपहरण करून पट्ट्याने मारहाण, तिघांना अटक

एमपीसीन्यूज : खाजगी सावकाराने कर्ज आणि व्याज वसूल करण्यासाठी एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. इतकेच नाही तर मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करून पैसे न दिल्यास व्हिडिओ वायरल करण्याची धमकी दिली.

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघा खाजगी सावकारांना अटक करण्यात आली आहे. 25 नोव्हेंबर रोजी येरवडा परिसरात हा प्रकार घडला.

अविनाश कांबळे (वय 28) तानाजी विठ्ठल जाधव (वय 30) आणि तुषार हनुमंत शेळके (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 36 वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी अविनाश कांबळे यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्जाची ही रक्कम आणि व्याज वसूल करण्यासाठी अविनाश कांबळे याने इतर दोन साथीदारांच्या मदतीने विमाननगर येथील ऑफिस मधून फिर्यादीचे अपहरण केले. त्यानंतर त्याला येरवड्यातील एका मोकळ्या मैदानावर येऊन कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली.

ही मारहाण होत असताना इतर आरोपींनी मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि कर्जाचे, व्याजाचे पैसे न दिल्यास हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. फिर्यादीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करतात तीनही आरोपींना अटक केली आहे.

अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर करीत आहेत

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.