Pune City Signals : आता सर्व चाैकात डाव्या बाजूला विनासिग्नल वळता येणार !

एमपीसी न्यूज : भारतातील दिल्ली, चंदीगड, बेंगलोर इत्यादी मोठ्या शहरांप्रमाणेच पुण्यातही प्रत्येक चौकात वाहनचालकांना डावीकडे वळण घेण्यास परवानगी देणारा प्रस्ताव शहर सुधारण समितीने मंजुर केला आहे.

‘लेफ्ट वे फ्री’ केल्यानंतर वळणावरील वाहतूक नियंत्रण दिव्यांची ( सिग्नल) आवश्यकता भासणार नाही. तसेच चाैकातील वाहतूक काेंडी कमी हाेण्यास मदत हाेईल.

याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भैय्यासाहेब जाधव आणि शिवसेनेचे नगरसेवक अविनाश साळवे यांनी शहर सुधारणा समितीसमाेर ठेवला हाेता. त्यास शहर सुधारणा समितीने मंजुरी दिली असून, मुख्यसभेने मंजुरी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी ताे वाहतूक पोलिसांकडे पाठविण्यात येईल.

याबाबत शहर सुधार समितीचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, दिल्ली, चंदीगड, बेंगळुरु इत्यादी मोठ्या शहरांमध्ये, प्रत्येक चौकात डावीकडे थेट वळण्यास परवानगी आहे. यामुळे त्या शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. तेथे वाहने कोणत्याही चौकात (मोकळे डावे) कोणत्याही अडथळ्याशिवाय डाव्या बाजुने सोडली जातात. असा प्रयोग पुणे शहरात होणे आवश्यक आहे. असे प्रस्तावात नमूद केले आहे.

पुणे शहरातील अनेक चौकांत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आणि वाहतूकीची कोंडी निर्माण होते. या चाैकात सिग्नल असल्याने डावीकडे वळणारी वाहने देखील चाैकातील रस्त्यावर थांबून राहतात. यामुळे चाैकातील वाहनांची संख्या वाढत जाते.

पुणे शहरातील अनेक चाैकांतील रस्ते अरुंद आहेत. त्याचाही परीणाम हाेत असताे. ही वाहतूक काेंडी कमी करण्यासाठी डावीकडे वळण्यासाठी चाैकात थांबून राहीलेल्या वाहनांना थेट वळण्यास परवानगी दिली तर तेथील वाहतूक काेंडी 33 टक्क्याने कमी हाेऊ शकते. प्रत्येक चाैकातील वाहतूक व्यवस्था, उपलब्ध जागा आणि नकाशा याचाही विचार करण्यासंदर्भातही समितीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. यावर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांनुसार अंमलबजावणी करतात हे पाहणं औत्युक्याचं ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.