Pune: ‘कोरोना’च्या भीतीमुळे पर्यटन व्यावसायिकांचे 150 कोटींचे नुकसान

विदेशातच नव्हे तर देशातही प्रवास करण्यास पुणेकरांचा नकार

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ रोगामुळे पुणेकरांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विदेशातच नव्हे तर देशातही प्रवास करण्यास पुणेकर नकार देत आहेत. त्यामुळे आम्हा पर्यटन व्यवयसायिकांचे सुमारे 150 कोटी रुपये नुकसान होण्याचा अंदाज आहे.  एन्टरप्रायजिंग ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन (पश्चिम भारत) तर्फे बुधवारी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली.

यावेळी विजय मंडलिक, नितीन शास्त्री, मंदार सत्रे, सुरेंद्र कुलकर्णी, संतोष खवले उपस्थित होते. पुणे शहरात 200 ट्रॅव्हल एजंट आहेत. दरवर्षी साधारण 40 ते 50 हजार पुणेकर देश आणि विदेशात प्रवास करीत असतात. प्रत्येक पर्यटकाचा 30 हजार बुकिंग आणि प्रवास करणाऱ्या ठिकाणी 20 ते 30 हजार रुपये खर्च होतो. हा खर्च एका पर्यटकामागे साधारण 70 हजारांपर्यंत जातो. त्यामुळे आम्हा पर्यटन व्यवयसायिकांचे साधारण 150 कोटी रुपये नुकसान होण्याचा अंदाज आहे.

कोरोनाचे चुकीचे मेसेज फेसबुक, व्हॉट्सअपवरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. शासनातर्फे करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची वस्तुस्थिती मांडण्याची गरज आहे. आमचे बुकिंग 3 ते 4 महिने आधी होते. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत विद्यार्थ्यांच्या परीक्षा असते. या कालावधीत एप्रिल, मे, जूनचे बुकिंग केले जाते. सध्या कोरोनाचा भीतीमुळे नागरिक जूनच्या टूर रद्द करीत आहेत. आतापर्यंत 90 टक्के टूर रद्द करण्यात आल्या आहेत. हे बरोबर नाही. टूर रद्द करण्यापूर्वी काही कालावधी जाऊ द्यावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले.

आम्ही पर्यटकांचे 2 ते 4 महिने आधी बुकिंग करतो. बुकिंग करतानाच कॅन्सलेशनचे नियम ठरलेले आहेत. 15 दिवस आधी बुकींग रद्द केले तर काहीच पैसे मिळत नाही. विमान कंपन्या आम्हाला कॅन्सलेशन चार्जेस लावतात. सध्या कोरोनाचा भीतीमुळे आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाण बंद आहेत. तर, देशांतर्गत उड्डाण सुरू आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

चीन, जपान, कोरिया, इटली, इराण या देशानंतर आता या व्हायरसचा प्रादुर्भाव जगातील इतर देशाप्रमाणे भरतातही काही प्रमाणात होताना दिसत आहे. कोरोनाबाबतची सद्यस्थिती काय आहे, याचा खुलासा केंद्र सरकारच्या पर्यटन विभाग आणि आरोग्य विभागाने वारंवार केला आहे, याकडेही पत्रकार परिषदेत लक्ष वेधण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.