Pune : ‘माती’ कुस्तीत प्रशांत जगपात 86 किलोत तर, नितिन पवार 70 किलोत ठरले सुवर्णपदकाचे मानकरी!

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि पुण्यातील अमनोरा टाऊनशिपचे विकसक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’ची सुरुवात रविवारी सकाळच्या सत्रात 70 आणि 86 किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीने झाली. म्हाळूंगे- बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत हे अतीतटीचे सामने रंगले होते. यात सोलापुरचा प्रशांत जगपात (८६ किलो) आणि कोल्हापूर शहराचा नितिन पवार (70 किलो) यांनी सुवर्ण पदके पटकावले.

आज ७० आणि ८६ किलो वजनी गटातील माती विभागातील अंतिम फेरीचे सामने पार पडले. यात ८६ किलो वजनी गट- माती विभागात सोलापूरच्या प्रशांत जगताप याने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला ८-२ गुणांनी पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले. प्रशांत हा वयाच्या २२ व्या वर्षी प्रथमच महाराष्ट्र केसरी वजनी गट स्पर्धेतीत सहभागी झाला आणि पहिल्याच वर्षी सुवर्णपदकावर त्याने आपली मोहर उमटविली.

सोलापूर जिल्हयातील कुंभारगाव येथील हा पहिलवान वस्ताद अमृत मामा भोसले यांच्या तालमीत तयार झाला आहे. तसेच पुण्याच्या संतोष पडळकरने सांगलीच्या रणजीत पवारला १०-० ने हरवत कांस्य पदकावर मोहर उमटवली.

यावेळी अंतिम ७० किलो वजनी गटात माती विभागात कोल्हापूर शहर पहिलवान नितिन पवार व कोल्हापूर जिल्ह्यातील मच्छिंद्र निवंगरे यांच्यात अत्यंत चुरशीची व अतीतटीची लढत झाली. दोघांनीही ४-४ गुण मिळविले. मात्र नियमांनुसार निर्धारित वेळेतील अंतिम गुण हा नितिन पवार याने पटकाविल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले व तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.

नितिन पवारने यापूर्वी २०१७च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले होते. महाराष्ट्र केसरी वजनी गटातील ही त्याची पाचवी स्पर्धा असून वस्ताद कृष्णात पाटील यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील संतोष गावडे याने उस्मानाबादच्या लक्ष्मण जाधवला २-१च्या फरकाने हरवत कांस्य पदक जिंकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.