Pune : उपमहापौरांच्या पुढाकारातून विजयस्तंभ परिसरात स्वच्छता

एमपीसी न्यूज – कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास शौर्यदिनानिमित्त (दि. 1 जानेवारी) लाखो भीमसैनिकांनी अभिवादन केले. हा अभिवादन सोहळा शांततेत पार पडला. या परिसरात आज (बुधवार) पुणे महापालिकेचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून विजयस्तंभ परिसर स्वच्छ करण्यात आला.

डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सकाळी सात वाजता कोरेगाव भीमा येथे जाऊन सरपंच रुपेश ठोंबरे यांची भेट घेतली. त्यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, कोरेगाव भीमाचे उपसरपंच शिवाजी वाळके, महिला समितीच्या सुवर्णा चव्हाण व स्वच्छ संस्थेच्या कर्मचा-यांनी मिळून विजयस्तंभ परिसर चकाचक केला.

   

विजयस्तंभ अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय आल्याने विजयस्तंभावजवळ पुष्पचक्र, फुले आणि इतर साहित्याचा ढीग लागला होता. तसेच परिसरात पाण्याच्या बाटल्या, नाष्ट्याच्या प्लेट्स, जेवणाच्या पत्रावळ्या असा कचरा पडला होता. नगर रस्त्यावरील लोणीकंद ते कोरेगाव भीमा हा परिसरही स्वच्छ करण्यात आला. डॉ. धेंडे यांनी स्थानिकांच्या सहकार्याने ही स्वच्छता मोहीम राबविली.

याबाबत डॉ. धेंडे म्हणाले, “विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी यंदा मोठी गर्दी झाली. प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले होते. मात्र, गर्दीचा अंदाज न आल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी वगळता अभिवादनाचा कार्यक्रम अतिशय शांततेत पार पडला. त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.