Pune : पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाले मोकळे करा : महापौर

Clear all the nallas in the city before the rainy season: Mayor

एमपीसी न्यूज – पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुणे शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई करून ते मोकळे करा, तसेच आवश्यक कामेही पूर्ण करा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

शहरातील पुरप्रवण क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांची पाहणी महापौर मोहोळ यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.

कोथरूड – बावधन, वारजे – कर्वेनगर, ढोले पाटील रोड, येरवडा – कळस – धानोरी, नगररोड – वडगावशेरी, वानवडी – रामटेकडी आणि हडपसर – मुंढवा या क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारीतील परिसराची महापौरांकडून पाहणी करण्यात आली.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शंतनू गोयल, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, आमदार सुनील कांबळे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर, दिलीप बराटे, प्रशांत जगताप, दिलीप वेडेपाटील, किरण दगडेपाटील, दीपक पोटे, सचिन दोडके, राजेश बराटे, उमेश गायकवाड, योगेश ससाणे, धनराज घोगरे, भैय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, नगरसेविका वैशाली बनकर, रत्नप्रभा जगताप, सुमन पठारे आदी यावेळी उपस्थित होते.

पुणे शहरातील जे नाले सिमेंट पाईपद्वारे बंद केले आहेत, ते सर्व खुले करावेत. कोथरूड स्मशानभूमी येथील पिण्याच्या पाण्याची लाईन शिफ्ट करावी. कलव्हर्ट आणि स्मशानभूमीची भिंत नव्याने उभारण्यात यावी.

किमया हॉटेल परिसरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग उपलब्ध करून घ्यावा. शहरातील नाल्यांवरून जाणाऱ्या महावितरणच्या केबल्स सुरक्षित करण्याबाबत पत्रव्यवहार करावा, अशा सूचना महापौरांनी प्रशासनाला दिल्या.

तसेच फुलेनगर – येरवडा आंबेडकर सोसायटी परिसरात नाल्यातील काँक्रीटीकरण तोडून नाल्याचे रुंदीकरण करण्यात यावे. हडपसर स्मशानभूमीलगत पावसाळी कामे पूर्ण करावी.

कोंढवा स्मशानभूमी परिसरात नाल्यातील चॅनेल फोडून नाला रुंद करण्यात यावा, अशा अनेक सूचना महापौरांनी प्रशासनाला केल्या. नालेसफाई पाहणी दरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनीही अनेक सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.