Pune : कांदा 150 रुपये किलो झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले -रुपाली चाकणकर

एमपीसी न्यूज – 150 रुपये किलो कांदा झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. केंद्र सरकारने यावर उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँगेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकार यांनी व्यक्त केले.

प्रदेशाध्यक्षा झाल्यानंतर चाकणकर यांनी गुरुवारी प्रथमच महापालिकेत चार मतदारसंघांतील महिला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, महिला शहराध्यक्षा स्वाती पोकळे, निरीक्षक पौर्णिमा काटकर यावेळी उपस्थित होत्या.

कांद्याचे उत्पादन आपल्या इथे कमी झाले आहे. नवीन कांदा मार्केटमध्ये येण्यास दोन – तीन महिने जाणार आहेत. वाढते कांद्याचे दर कमी झालेच पाहिजे, असे दिलीप बराटे यांनी सांगितले.

12 डिसेंबरला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘विचार सायबांचा, सन्मान महिला धोरणांचा’ कार्यक्रम संपूर्ण राज्यभर करण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे चाकणकर म्हणाल्या.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येत असताना महिला सुरक्षेला प्राधान्य असेल. दक्षता समिती स्थापन करणे, मोफत हेल्पलाईन, बचत गटांना सहकार्य करणे, व्यावसायिक मार्केटिंग करण्यासाठी राष्ट्रवादी मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, आपण विधानपरिषदेत सदस्य होऊन मंत्री पदासाठी इच्छुक आहात का? असा सवाल उपस्थित केला असता, पक्ष आपल्याला देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.