Pune : कोरोनामुळे रस्ते – चौक सुशोभीकरणाची कामे थांबविण्याचे आयुक्तांचे आदेश

Commissioner orders to stop road-square beautification work due to corona

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्याचा फटका महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला आहे. 2020 – 21 च्या बजेटचाही लवकरच आढावा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्ते व चौक सुशोभीकरणाची कामे थांबविण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ घेण्यात आलेल्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात मंदी असताना आता कोरोनामुळे आणखी मोठे संकट निर्माण झाले आहे. बांधकाम क्षेत्रात उठाव नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.

तसेच जीएसटी अनुदान, बांधकाम विकास शुल्क व मिळकतकरातून मिळणारे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी अपेक्षित बजेट कोलमडण्याची भीती आहे.

शहरात चौक आणि रस्त्यांची सुमारे चाळीस लाखाहून अधिक रकमेची कामे प्रस्तावित होती.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, आंबेगाव दत्तनगर, कात्रज गावठाण या भागातील चौकांचे सुशोभीकरण, कोंढवा खुर्द-मीठानगर व रामटेकडी-सय्यदनगर प्रभागातील रस्त्यांची देखभाल दुरुस्ती आणि कोंढवा खुर्द-मीठानगर येथील चौकांचे सुशोभीकरण या कामांसाठी निविदा काढण्यात आली होती. ती आयुक्तांनी रद्द केली आहे.

सध्या कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य सुविधेला प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेतर्फे होणाऱ्या उधळपट्टीला आयुक्तांनी लगाम घातला आहे. दरम्यान, सध्या लॉकडाऊन असल्याने मिळकत कर मोठ्या प्रमाणात थकला आहे.

महापालिकेला सध्या पैशाची गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मिळकत कर ऑनलाइन भरण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like