Pune : कोरोनाच्या युद्धात महापौर आणि विरोधी पक्षांकडून ‘आयुक्त टार्गेट’

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटातून पुणेकरांना वाचवता येत नसेल तर महापालिका आयुक्तांनी राज्य शासनाच्या सेवेत परत जावे, अशी टीका काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना – मनसेने केली असतानाच महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही नव्याने जाहीर केलेल्या लॉकडाउनला विरोध केला आहे. यामाध्यमातून माध्यमातून महापौर आणि विरोधी पक्षांकडून महापलिका आयुक्तांना टार्गेट केले जात असल्याचे दिसून येते.

महापालिका प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने मोठ्या प्रमाणात पुणेकर नागरिक रस्त्यांवर येत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संकट आणखी गंभीर होणार असल्याचे महापौर आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. महापालिका आयुक्तांनी त्याचा विचार करायला हवा होता, अशा शब्दांत महापौरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.

तर, महापालिकेतील गटनेते कोरोना संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्याकडे आलेच नाही, असे सांगून महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनीही ‘मास्टरस्ट्रोक’ हाणला. नगरसेवकांच्या निधीतून धान्य देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. पण, हे धान्य नेमक्या कोणत्या नागरिकांना द्यायचे हे सुद्धा गटनेत्यांनी सांगितले नसल्याचे आयुक्तांचे म्हणणे आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विलगीकरण कक्षात ठेवलेल्या नागरिकांसाठी चांगले जेवण मिळत नाही. एकाच खोलीत कारोना पॉझिटिव्ह – निगेटिव्ह रुग्णांना ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोना होण्याची भीती असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

याबाबत विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ म्हणाल्या, गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करण्याचा ठराव स्थायी समितीने सर्वानुमते मान्य केल्यानंतर मी महापौर आणि आयुक्तांची भेट घेतली होती. या विषयावर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्याची मागणीही केली होती. तसे पत्रही आपल्याकडे आहे. पण, आयुक्तांनी ही बैठक काही घेतली नाही.

उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी 5 नव्हे 10 लाख रुपये घ्या, पण गोरगरीब नागरिकांना अन्नधान्य द्या, असे आदेश दिले आहेत. तरीही या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.